दुर्दैवी बलात्कारित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी सहानुभूतीचे जे राजकारण दिवसभर खेळून पाहिले, ते अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अभागी मुलीच्या कुटुंबीयांना भेटून सहानुभूती दाखवायची होती तर त्यासाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा, मोटारींचे ताफे, काँग्रेस पक्षाचे झेंडे असा तामझाम कशासाठी? बलात्कार पीडितेचा हकनाक जीव गेला, त्याचा राजकीय मुद्दा करून कुरघोडीचे डावपेच लढविणे हे कितपत माणुसकीला धरून आहे.
हाथरस येथील बलात्काराच्या भयंकर घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. ज्या नराधमांनी हे कृत्य केले, त्यांना कुठलीही दयामाया न दाखवता कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशीच प्रत्येक भारतीयाची भावना असेल. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका छोट्याशा गावात दलित मुलीवर चार-पाच गावगुंडांनी सामुहिक बलात्कार केला. इतकेच नव्हे तर गळा दाबून तिला संपवून टाकण्याचा प्रयत्न देखील केला. या झटापटीत त्या अभागी मुलीच्या मणक्याची हाडे मोडली. गंभीर जखमी अवस्थेत तिला दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळात दाखल करण्यात आले. ही घटना घडली 14 सप्टेंबरला आणि बुधवारी त्या मुलीने आपले प्राण गमावले. त्या दुर्दैवी दलित मुलीचा मृतदेह पोलिसांनी हाथरस येथे आणून रातोरात तिच्यावर अंत्यसंस्कार केले असा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. बलात्काराच्या घटनेनंतर तब्बल आठवडा उलटून गेल्यावर पाच आरोपींना पकडण्यात आले. परंतु या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी कमालीची हयगय केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून हाथरस जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. वास्तविक ही घटना झाल्यानंतर अभागी मुलीच्या कुटुंबीयांना सर्वतोपरि साह्य देण्याची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. तसेच गुन्हेगारांना तातडीने शिक्षा व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे आदेशही दिले होते. संशयित आरोपींना अटक देखील झाली आहे. इतके होऊनही काँग्रेस पक्षाचे नेते बलात्कारासारख्या घटनेचा राजकारणासाठी वापर करत असतील तर त्याला काय म्हणायचे, हा खरा प्रश्न आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हाथरस येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला कारण त्यांच्या भेटीमुळे तेथील वातावरण अधिकच तणावपूर्ण होईल असे जिल्हा प्रशासनाचे मत होते. शिवाय कोरोना महामारीच्या थैमानामुळे राजकीय व सामाजिक भेटीगाठींवर देशभरातच निर्बंध लागू आहेत. परंतु या सार्याची कुठलीही तमा न बाळगता सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत काँग्रेस नेत्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. राहुल व प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रस्त्यातच ताब्यात घेऊन त्यांची दिल्लीला रवानगी केली. हाथरस येथील बलात्काराची घटना ताजी असताना राजस्थानातील बारां येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. परंतु हे प्रकरण राजस्थानातील असून तेथे काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे तिथे मोर्चा नेण्याचे काँग्रेस नेत्यांनी टाळले असावे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील बलात्कार प्रकरण हे भाजपशासित उत्तर प्रदेशातील बलात्कार घटनेपेक्षा कमी गंभीर मानावे काय? बलात्कार हा कुठेही झाला तरी तो घृणास्पदच असतो. त्याबद्दल सोयीचे आणि सवंग राजकारण करणे कुठल्याही पक्षाने टाळायलाच हवे. परंतु हतबल झालेल्या काँग्रेस पक्षाला हे साधे भानही उरलेले नाही हे दुर्दैवी आहे.