Breaking News

पेज नदीचे पाणी वाढल्याने आठ तरुण अडकले

स्थानिकांनी दोरखंडाच्या सहाय्याने सर्वांना वाचविले; कर्जत वैजनाथ येथील घटना

कर्जत : बातमीदार

पेज नदीच्या पाण्यात अडकलेल्या आठ पर्यटकांना रविवारी (दि. 19) वैजनाथ (ता. कर्जत) येथील ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून दोरखंडाच्या सहाय्याने  नदी बाहेर काढले आणि त्या सर्वांचे प्राण वाचविले.

कर्जत शहरातील आपल्या नातेवाईकांकडे रत्नागिरी येथील पाहुणे आले होते. रविवार ते सर्वजण वनभोजनासाठी वैजनाथ येथे गेले होते. तेथील पेज नदीच्या बंधार्‍यावर ते जेवणाचा आनंद घेत होते. त्या वेळी अचानक पेज नदीचे पाणी वाढू लागले आणि पाहता पाहता ते सर्व ज्या ठिकाणी बसले होते, त्या बंधार्‍याच्या आजूबाजूला पाणी भरले. त्यानंतर त्या आठ तरुणांनी आरडाओरड सुरु केली. तो ऐकून वैजनाथ गावातील अमित गुरव आणि प्रशांत बारणे यांनी नदीकडे धाव घेतली. नदीमध्ये आठ तरुण अडकल्याचे पाहून त्यांनी गावात जावून सूरज गुरव यांना माहिती दिली. गुरव यांनी गावातील गणेश भोईर, सरदार कांबळे, शरद रमेश पवार, नामदेव कातकरी तसेच अमित गुरव आणि प्रशांत बारणे यांना सोबत घेतले व दोरखंड घेवून नदी गाठली.

नदीमध्ये अडकलेल्या त्या सर्व तरुणांना दोरखंडाच्या सहाय्याने एक एक करीत  बाहेर काढले. मात्र त्यानंतर रत्नागिरी येथील त्या तरुणांनी आपल्या जीपमध्ये बसून धूम ठोकली.

दुपारीच पाणी सोडल्याने ओढवला बाका प्रसंग

दर रविवारी उशिरा धरणातून पेज नदीत पाणी सोडले जाते, मात्र 19 जून रोजी धरणातून दुपारीच पाणी सोडण्यात आले आणि पेज नदीचे पाणी अचानक वाढले. परिणामी झिरो बंधार्‍याच्या आजूबाजूला पाणी वाढले आणि  येथे गेलेले ते आठ तरुण अडकले, अशी माहिती वैजनाथ ग्रामस्थ सूरज गुरव यांनी दिली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply