Breaking News

मुंबईने चेन्नईला रोखले

मुंबई : प्रतिनिधी

जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने केलेल्या मार्‍याच्या जोरावर मुंबईने बुधवारी (दि. 3) घरच्या मैदानावर विजयाची नोंद केली. चेन्नई सुपरकिंग्जवर 37 धावांनी मात करीत मुंबईने बाराव्या हंगामातील चेन्नईची विजयाची मालिका खंडीत केली आहे. मुंबईने दिलेल्या 171 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 133 धावांपर्यंत मजल मारू शकला.

चेन्नईकडून मराठमोळ्या केदार जाधवने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली, मात्र त्याला इतर खेळाडूंची हवी तशी साथ मिळाली नाही. मुंबईने संघात संधी दिलेल्या जेसन बेहरनडॉर्फने पहिल्याच षटकात चेन्नईला धक्का दिला. अंबाती रायुडूला माघारी धाडत बेहरनडॉर्फने पहिला बळी घेतला. यानंतर शेन वॉटसन आणि सुरेश रैनाही ठराविक अंतराने माघारी परतले. केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी भागीदारी करीत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर चेन्नईच्या डावाला पुन्हा गळती लागली.  मुंबईकडून लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी तीन, तर बेहरनडॉर्फने दोन बळी घेतले. मुंबईकडून गोलंदाजांसोबत क्षेत्ररक्षकांनीही चांगली कामगिरी बजावली. किएरॉन पोलार्ड आणि यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉक यांनी सामन्यात चांगले झेल पकडले.

त्याआधी, सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि त्याला कृणाल पांड्याने दिलेली साथ या जोरावर घरच्या मैदानावर खेळत असताना मुंबई इंडियन्सने 170 धावांपर्यंत मजल मारली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर क्विंटन डी-कॉक, कर्णधार रोहित शर्मा आणि युवराज सिंह हे ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर यादव आणि पांड्या जोडीने मुंबईचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे मुंबईच्या संघाने आश्वासक धावसंख्याही गाठली. यादवने 43 चेंडूंत 59 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. सूर्यकुमार अखेरच्या षटकांमध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ब्राव्होच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी अखेरच्या दोन षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला 170 धावांचा टप्पा गाठून दिला. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply