उपाययोजनांवर भर देण्याचा निर्धार
पाली : प्रतिनिधी : जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या सुधागडातील अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहचत असून, तेथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी मंगळवारी (दि. 7) तहसिल कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. त्यात पाणी पुरवठ्याच्या उपाययोजनांवर भर देण्याचा निर्धार करण्यात आला. सुधागड तालुक्यातील उन्हेरे धरणातील जॅकवेल विहीर पडकी झाली असून, तीची दुरुस्ती करणे तसेच या धरणाची गळती थांबवून पाण्याचा होत असलेला अपव्यय रोखणेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करणेबाबत या बैठकीत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. पडसरे, बलाप, राबगाव, महागाव, चिवे, वाफेघर येथील तलावाचा गाळ उपसून जलस्त्रोत वाढविण्याबाबत कृतीशिल नियोजन करण्याचे ठरले. या परिसरातील धरणे कोरडी पडण्यास पाटबंधारे विभागाचा नियोजनशुन्य व गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप करुन उपस्थित लोकप्रतिनिधीं व पत्रकारांनी कोलाड पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरले. तर सध्यस्थीतीत सुधागड तालुक्यातील धरणात 30 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, त्यातून जून महिन्यापर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सहाय्यक अभियंता रामदास तुपे यांनी सांगितले. सुधागड तालुक्यातील प्रकल्प, फार्महाउस, स्वीमींग टँककरीता विजेचे पंप लावून नदीतून केल्या जाणार्या अवैध पाणीउपशावर तसेच नदीलगत भराव करणार्यावर कारवाई करण्याची मागणी या बैठकीत लावून धरण्यात आली. सुधागड तालुक्यात लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नळपाणीपुरवठा योजना अनेक ठिकाणी बंद पडल्या आहेत. परिणामी पाणीटंचाईच्या झळा अधिक जाणवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, पाणीटंचाईसारख्या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी या बैठकीत केले. पाली सरपंच विलास बालके, उपसरपंच विजय मराठे, ग्रा.पं. सदस्य अमित निंबाळकर, भास्कर दुर्गे, अजय मुळे, तसेच ग्रामसेवक आजीनाथ खेडकर, मिलिंद धाटावकर, राजेंद्र मोहरे, आदिंसह लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी या बैठकीस बहुसंख्येने उपस्थीत होते.
भावशेत, भावशेत आदिवासीवाडी तसेच पुई गावासह टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तालुक्यात पाणीप्रश्नाच्या सोडविणुकीसाठी बुधवारी जिल्हाधिकार्यांची भेट घेवून मार्गदर्शन घेणार आहे.
-दिलीप रायन्नावार, तहसिलदार, पाली-सुधागड