मालती आंग्रे अध्यक्षपदी, तर विभावरी कुळकर्णी उपाध्यक्षपदी
पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील कमळ महिला नागरी सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून मालती चंद्रकांत आंग्रे आणि उपाध्यक्ष म्हणून विभावरी विद्याधर कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक बालाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पतपेढीच्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. ती बिनविरोध झाली. यात संचालिका म्हणून अपर्णा श्रीनिवास पेंडसे, पूर्वा प्रशांत खेडेकर, पूनम सचिन बांदोडकर, उर्मिला अर्जुन वंजारी, अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, चित्रा रमेश मानकामे, वृंदा विनायक वत्सराज, मनीषा दिलीप विसपुते व सुषमा सुरेश जांभळे यांची निवड झाली आहे.
या वेळी संस्थेचे संस्थापक तथा तज्ञ संचालक शशिकांत बांदोडकर तसेच संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बालाजी वाघमारे यांनी निवडून आलेल्या संचालकांचा तसेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला, तर निवडणूक यथायोग्य पार पाडण्यास श्री. वाघमारे आणि दत्तात्रेय धायगुडे यांनी सहकार्य केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. संस्थेच्या विद्यमान अध्यक्षांनी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल संचालकांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना सदिच्छा दिल्या.