माणगाव : प्रतिनिधी
सर्वांच्या सहकार्यामुळे आपली सहकारी पतपेढी नावारूपास आली असून पतपेढीची शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे चेअरमन राजेश सुर्वे यांनी रविवारी (दि. 28) माणगाव येथे केले. रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी-अलिबाग या पतसंस्थेची 98वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी चेअरमन राजेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव येथील कुणबी भवन हॉलमध्ये झाली. त्या वेळी सुर्वे उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करीत होते. या सभेच्या सुरुवातीस निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच विविध पदांवर नियुक्त झालेल्या तसेच खेळांमध्ये प्राविण्य दाखविलेल्या व्यक्तींचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. त्यानंतर पतपेढीचे मानद सचिव वैभव पिंगळे यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृताचे वाचन केले. या वेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे चेअरमन सुर्वे व संचालक मंडळाने निरसन केले. पतपेढीचे पॅनल प्रमुख नरेंद्र गुरव, व्हाईस चेअरमन देवानंद गोगर, संचालक उमेश महाडेश्वर, भगवान घरत, सुशील वाघमारे, उदय गायकवाड, दीपक बोडके, संचालिका चंचला धनावडे यांच्यासह सभासद या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.