Breaking News

सिद्धेश्वर ग्रामपंचायतीची प्लास्टिकमुक्तीकडे वाटचाल

प्लास्टिक बंदीचा कायदा करूनही प्लास्टिकचा भस्मासूर दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे या प्लास्टिकचा पुनर्वापर व प्रक्रिया व्हावी यासाठी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यासाठी 5आर मुंबई ही संस्था, रायगड जिल्हा परिषद, सुकन्या संघ, शाळा, स्वदेस समिती व प्राईड इंडिया यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत मागील आठवड्यात गावातील लोकांनी जमविलेले तब्बल 300 किलो प्लास्टिक व 20 किलो ग्लास वेस्ट पुनर्वापर (रिसायकल) करण्यासाठी मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त होऊन पर्यावरणाचे संरक्षण आणि घनकचरा व्यवस्थापन उत्तम प्रकारे होणार आहे. सरपंच उमेश यादव यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार झाला. यासाठी 5आर मुंबई संस्था, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, महिला ग्रामसंघ, महिला बचतगट व समाजसेवी संस्था यांचे महत्त्वपूर्ण योगदान व सहकार्य लाभले आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार रवींद्र पाटील, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवरांनी या प्रकल्पाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले आहे. प्लास्टिक मुक्त ग्रामपंचायतीसाठी सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने जे पाऊल उचलले आहे, ते संपूर्ण जिल्ह्यासाठी दिशादर्शक आणि आदर्शवत आहे, असे या मान्यवरांनी सांगितले. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गाव आणि वाड्या प्लास्टिक मुक्त होण्याकडे वाटचाल करीत आहेत. प्रकल्पाची अंमलबजावणी होण्यापूर्वी 5आर संस्थेच्या स्मिता बिरकर यांनी कोणते व कसे प्लास्टिक गोळा करायचे ते बाहेर फेकल्याने त्याचे पर्यावरण, वन्य व पाळीव जनावरांवर होणारे दुष्परिणाम याची माहिती दिली होती. शिवाय गोळा झालेले प्लास्टिक अधिकृत पुनर्प्रक्रियेसाठी घेऊन जाण्याविषयी ग्रामपंचायतीबरोबर नियोजन केले.

सर्वांचा सहभाग : मागील सहा महिन्यांपासून ग्रामस्थ, ग्रामसंघ अध्यक्षा प्राची यादव, तसेच स्नेहा यादव आणि प्राची कदम यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी, स्वदेश समित्या, प्राइड इंडिया प्रतिनिधी व ग्रामपंचायत टीमने केलेले प्रयत्न यामुळे तब्बल 300 किलो प्लास्टिक व 20 किलो ग्लास वेस्ट संकलन करून ते पुनर्वापरासाठी पाठवणे शक्य झाले. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक गुराढोरांच्या पोटात जाण्यापासून वाचले, तसेच नदी-नाल्यांमध्येदेखील गेले नाही. यामुळे पर्यावरण संवर्धन व गाव आरोग्यदायी झाले.

जबाबदारी उचलली : ग्रामपंचायतीने सर्व घरातील प्लास्टिक जमा करण्याची जबाबदारी सुकन्या ग्रामसंघ व त्यामध्ये समाविष्ट असलेल्या 20 बचत गटांवर सोपवली आहे. ही जबाबदारी सामाजिक बांधिलकी समजून स्वीकारून पुढे योग्य पार पाडण्याची ग्वाही ग्रामसंघ अध्यक्षा प्राची यादव यांनी दिली. ग्रामपंचायत हद्दीतील चारही शाळांचे शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. यामुळे सर्वांनी प्लास्टिक संकलनाची जबाबदारी उचलून प्रकल्पाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे वाटचाल केली. शिवाय राष्ट्रीय सण व सार्वजनिक कार्यक्रमावेळी गाव वाड्यांवर स्वच्छता अभियान राबवून देखील प्लास्टिक गोळा करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनासाठी नुकतेच गावागावात डस्टबीनदेखील वाटण्यात आले आहेत.

असे केले संकलन : ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांना प्लास्टिक कसे व कोणते गोळा करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक घरात प्लास्टिक संकलन करण्यासाठी विशिष्ट पिशव्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येकाने सुक्या प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक बॉटल यामध्ये जमा केल्या, तसेच गावात संकलन केंद्र उभारण्यात आले. घराघरात जमा केलेले प्लास्टिक संकलन केंद्रावर आणण्यात आले आणि हे जमा केलेले प्लास्टिक 5आर संस्थेने मुंबई येथे रिसायकल करण्यासाठी नेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील गाव व वाड्यावस्त्या प्लास्टिक मुक्त तर होणार आहेतच, त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनदेखील होईल आणि आपोआपच पर्यावरण संवर्धन होत आहे.

-धम्मशील सावंत

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply