माथेरान : रामप्रहर वृत्त
माथेरानमध्ये प्रसादभाई सावंत मित्र परिवार, क्रीडालोजी, स्पोर्ट्स वर्क्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलात शनिवारी (दि. 4) 14 आणि 16 वर्षांखालील मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये 14 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मुंबई बॉईज, तर 16 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक आंस्ट्रेंगुंग युनायटेड संघाने पटकावला.
14 वर्षाखालील गटात चार संघ होते, तर 16 वर्षाखालील संघात पाच संघ सहभागी झाले होते.एकूण नऊ संघात 120 खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये 14 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मुंबई बॉईज, द्वितीय क्रमांक एफसी विगोर, तृतीय क्रमांक मुंबई स्ट्रायकर्स यांनी मिळविला, तर 16 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक आंस्ट्रेंगुंग युनायटेड संघाने पटकावला. या सर्वच विजेत्या खेळाडूंना नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि माथेरान नगर परिषद गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी महिला संघटक संगीता जांभळे, शलाका शेलार, समीना महापुळे, प्रीती कळंबे, सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी शिंदे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. रवी परब, श्रेयस गायकवाड, नानू राऊत आणि रोहित डिसोझा यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आयजिनासाठी माथेरान नगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले.
– ही स्पर्धा प्रायोगिक तत्त्वावर आयोजित केली होती. येणार्या काळात राज्यस्तरीय आणि देशस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे. जेणेकरून आपल्या माथेरानला प्रसिद्धी मिळून पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होऊ शकेल.
-प्रसाद सावंत, गटनेते तथा बांधकाम सभापती, माथेरान नगर परिषद