बंगळुरू : वृत्तसंस्था
आयपीएलच्या बाराव्या सीझनमध्ये खेळाडू आणि पंचांमधील वाद आणखीच चिघळत आहे. ताजं प्रकरण इंग्लिश अंपायर नायजेल लॉन्ग यांच्या रागाशी संबंधित आहेत. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील एका सामन्यादरम्यान रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि पंच नीजल लॉन्ग यांच्यात वाद झाला. या वादानंतर पंच लॉन्ग प्रचंड संतापले. हैदराबादच्या डावानंतर अंपायर रूममध्ये पोहोचले. आपला राग काढण्यासाठी त्यांनी अंपायर रूमच्या दरवाजावरच लाथ मारली. रागाच्या भरात असलेल्या लॉन्ग यांची लाथ एवढी जोरात होती की अंपायर रूमचा दरवाजाच तुटला. या वेळी अनुभवी पंच लॉन्ग यांच्याकडून चूक नक्कीच झाली होती. टीव्ही रिप्लेमधील फुटेज समोर आल्यानंतर स्पष्ट झालं की, उमेश यादवचा मागचा पाय रेषेच्या मागेच पडला होता. नियमानुसार हा नोबॉल नव्हता, मात्र लॉन्ग यांनी नोबॉल दिल्याने विराट आणि उमेश यादव यांनी पंचांवर नाराजी दाखवणं साहजिकच होतं. मैदानातील स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर उमेश यादव आणि विराट कोहलीने पंचांच्या निर्णयाचा विरोध केला, परंतु त्यांनी हा निर्णय मागे घेतला नाही.