खारघर : प्रतिनिधी
पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. स्टेशनबाहेर काही रिक्षाचालकांकडून याचा फायदा घेऊन प्रवाशांकडून अवाढव्य भाडे वसुली केली जात असल्याचा आरोप प्रवासी करू लागले आहेत. याबाबत कारवाईची मागणी होत आहे. सीएनजीवर चालणार्या रिक्षाचालकांकडून दरवाढीचे कारण सांगून बेसुमार भाडेवाढ केली जात आहे. मीटरप्रमाणे न चालणार्या रिक्षाचालकांकडून काही अंतराचे प्रवास गाठण्यासाठी प्रवासासाठी 25 ते 40 रूपये आकारले जात असल्यामुळे सर्वसामान्यांना पायी मार्गक्रमण केल्याशिवाय पर्याय नाही. 2021 रोजी एमएमआरटीएने मुंबई महानगर क्षेत्राकरिता पहिल्या दीड किलोमिटरसाठी मिटरप्रमाणे 21 रूपये दर निश्चित केले आहेत. पनवेलमध्ये काही रिक्षाचालकांवर परिवहन विभागाचा अंकुश नसल्यामुळे रिक्षामिटरप्रमाणे चालत नाहीत. बहुतांशी रिक्षा सीएनजी वर कार्यरत असल्याने रिक्षाचालकांची पूर्वीपेक्षा जास्त इंधन बचत होत आहे. अशा परिस्थितीतदेखील काही रिक्षाचालक जादा भाडे आकारात असतात. पनवेल रेल्वे स्टेशनसह शहरातदेखील काही रिक्षाचालक असे प्रकार करीत आहेत. मीटरप्रमाणे भाडे न आकारणार्या रिक्षाचालकांची प्रवाशांनी तक्रार केल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो. नोटीस बजावून दंडदेखील आकारतो. पनवेल वाहतूक शाखा अशा तक्रारी आमच्याकडे केल्यास आम्हाला अशा रिक्षा चालकापर्यंत पोहचणे सोपे होईल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
भाववाढीचे कारण प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जाते. मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्याचा आग्रहदेखील या रिक्षाचालकांना करावा लागतो.
-शैलेश क्षीरसागर, प्रवासी
प्रवाशांच्या तक्रारीप्राप्त झाल्यावर रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येते. रिक्षाचालकांसोबत बैठका घेऊन त्यांना आम्ही प्रवासी भाडे, वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सूचना करतो.
-संजय नाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतुक शाखा