पर्यटकांचा अर्धा तास खोळंबा
कर्जत : बातमीदार
सध्या माथेरानला जाणार्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र तेथील मिनिट्रेनचे रडगाणे सुरूच आहे. बुधवारी (दि. 8) सकाळी नेरळ येथून निघालेल्या मिनीट्रेनचे इंजिनमध्येच बंद पडले आणि प्रवाशी पर्यटकांचा खोळंबा झाला.
माथेरानला मिनीट्रेनमधून जाण्यासाठी सकाळपासूनच पर्यटक नेरळ येथे येऊन थांबतात. शनिवार-रविवार वगळता मिनिट्रेनच्या दिवसभरात केवळ तीन फेर्या होतात. त्यामुळे मिनिट्रेनमधून प्रवास करण्यासाठी पर्यटक सकाळपासून तिकीटाच्या रांगेत उभे असतात. बुधवारी सकाळी 9 वाजता माथेरानकरिता मिनीट्रेन निघाली होती. पर्यटकांनी हाऊसफुल्ल होऊन निघालेली मिनीट्रेन नेरळ येथून 3 किलोमीटर अंतर गेल्यानंतर जुम्मापट्टी स्टेशनच्या अलीकडे थांबली. इंजिन बंद पडल्याने मिनीट्रेन थांबवावी लागली.
नेरळ येथील कार्यशाळेतून कर्मचारी आल्यानंतर मिनीट्रेनचे एनडीएम1-405 हे इंजिन पुन्हा सुरू केले आणि अर्ध्या तासांहून अधिक काळ थांबलेली मिनीट्रेन पुन्हा माथेरानला रवाना झाली. मात्र मिनीट्रेनच्या या नेहमीच्या रडगाण्यामुळे पर्यटकांचे हाल होत आहेत.