चेन्नई : वृत्तसंस्था
चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानात विजय मिळवत मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या विजयासह मुंबईने फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुबंईपुढे 132 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान लीलया पार केले आणि सामना सहा गडी राखून जिंकला
चेन्नईच्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक हे झटपट बाद झाले, पण त्यानंतर सूर्यकुमार आणि इशान किशन यांनी तिसर्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी रचली आणि मुंबईच्या विजयाचा पाया रचला. धावगती कशी वाढवायची, याचे उत्तम उदाहरण महेंद्रसिंग धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यात दाखवून दिले. कारण एकवेळ चेन्नई सुपर किंग्स शंभर धावांचा टप्पा ओलांडणार की नाही, असे चाहत्यांना वाटत होते, पण धोनीने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत संघाला 131 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. धोनीने या सामन्यात 29 चेंडूंत 37 धावा केल्या. त्याला या वेळी अंबाती रायुडूची चांगला साथ मिळाली. रायुडूने या सामन्यात 29 चेंडूंत 37 धावा केल्या.
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण चेन्नईच्या संघाची चांगली सुरुवात झाली नाही. चेन्नईने आपले पहिले तीन फलंदाज फक्त 32 धावांमध्ये गमावले, पण त्यानंतर अंबाती रायुडू आणि मुरली विजय यांनी संघाला स्थैर्य मिळवून दिले. विजय या वेळी 26 धावा करून बाद झाला, पण त्यानंतर रायुडू आणि महेंद्रसिंग धोनी यांनी संघाची धावगती चांगलीच वाढवली.
- धोनी होता बाद; पण खेळला शेवटपर्यंत…
एखादा खेळाडू आऊट झाला आणि तरीही तो डाव संपेपर्यंत खेळत राहीला, असे तुम्हाला पाहायला मिळाले नसेल, पण मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात अशी एक गोष्ट झाल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जसप्रीत बुमराच्या अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आऊट होता, पण त्यानंतर तो डाव पूर्ण होईपर्यंत खेळत राहिल्याचे पाहायला मिळाले. बुमराच्या 20व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनी मोठा फटका मारायला गेला आणि त्याची बॅट हातातून निसटली, पण त्या वेळी धोनीचा झेल पकडला गेला होता. धोनी बाद झाल्यावर मैदानावरील पंचांनी चेंडू योग्य आहे की नाही, याची तपासणी केली. त्या वेळी हा चेंडू नो-बॉल असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे धोनी नाबाद ठरला आणि अखेरपर्यंत खेळत राहिला.
…तर मुंबईचा विक्रम होईल आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये मुंबईने चेन्नईचा पराभव करून फायनल गाठली आहे. मुंबईची आयपीएलच्या 12 मोसमातली ही पाचवी फायनल आहे. सर्वाधिक फायनल गाठणारी मुंबई ही दुसरी टीम आहे. आतापर्यंत चेन्नईने सर्वाधिक सात वेळा आयपीएल फायनल गाठली आहे, तर बंगळुरूच्या टीमला तीन वेळा फायनमध्ये प्रवेश मिळाला आहे. सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड सध्या मुंबई आणि चेन्नईच्या नावावर आहे. मुंबईने तीन वेळा, तर चेन्नईने तीन वेळा आयपीएलवर आपलं नाव कोरलं होतं. यानंतर कोलकाता, हैदराबादने दोन वेळा आणि राजस्थानने एक वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. 12 मे रोजी होणार्या फायनमध्ये मुंबईचा विजय झाला, तर मुंबई आणि रोहित शर्मा 4 वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रम करतील.