आठवड्यात 611 मिमी पावसाची नोंद; बळीराजा गुंतला शेतात
म्हसळा : प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. चालू हंगामात पाऊस उशीरा सुरू झाला असला तरी त्याने मागील वर्षाची सरासरी गाठली आहे. म्हसळा तालुक्यात आजपर्यंत एकूण 1094 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
म्हसळा तालुक्यात गेल्या आठवड्यात 611 मिमी पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे नद्या, ओढे, नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. पाऊस अधूनमधून उघडीप देत असल्यामुळे बळीराजा लावणीच्या आणि बागायतदार आंबा-काजूच्या आणि अन्य बागायतींच्या मशागतीच्या कामात गुंतले आहेत.
तालुक्यातील 2400 हेक्टर क्षेत्रात भाताचे, 400 हेक्टर क्षेत्रात नागली, 100 हेक्टर क्षेत्रात वरीचे पिक घेतले जाते, तर फळबागायतीमध्ये 2400 हेक्टर क्षेत्रात आंबा, 700 हेक्टर क्षेत्रात काजू, 60 हेक्टर क्षेत्रात सुपारीचे पिक घेतले जाते. पोषक पाऊस झाल्याने घरातील सर्व मंडळी लावणीच्या कामात गुंतली आहेत. आंबा फळबागायतींना रिंगा काढून खत देण्याचे काम सुरू झाले आहे. सुपारीच्या पिकाला फवारणीचा कालावधी सुरु आहे. तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर कामात गुंतल्यामुळे बाजारात शुकशुकाट दिसत आहे.
समाधानकारक पाऊस झाल्याने घरातील सर्व सदस्य लावणीच्या कामात गुंतले आहेत. मजुरीचे दर वाढल्याने मजूर घेऊन शेती करणे परवडत नाही. मजूर घेऊन पिकविलेले तांदूळ बाजारापेक्षा महाग पडतात.
-दक्षता दिनेश घोले, शेतकरी, घूम, ता. म्हसळा