पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको यांची बैठक शुक्रवारी (दि. 3) सिडको भवनात झाली. सिडको उलवे नोड येथे नव्याने जो मास हाऊसिंग प्रकल्प आणत आहेत त्याला सर्वपक्षीय समितीने या वेळी प्रखर विरोध दर्शविला.
या बैठकीला लोकनेते दि. बा. पाटील साहेब संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उपाध्यक्ष बबन पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, समितीचे सचिव महेंद्र घरत, निमंत्रक अतुल पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, श्री साई देवस्थानचे विश्वस्त रविशेठ पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, महादेव घरत, तर सिडकोच्या वतीने सहव्यवस्थापक अशोक शिणगारे, मुख्य अभियंता डायरकर, अपर्णा मॅडम, उलवे नोडचे अभियंता श्री. गोडबोले, एअरपोर्टचे अभियंता श्री. मानकर आदी उपस्थित होते.
सिडको ही बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, शेलघर या ठिकाणी नव्याने मासहाऊसिंग प्रकल्प आणत आहे. उलवे नोड येऊन 10 ते 12 वर्षे झाली तरीसुद्धा या ठिकाणी कोणत्याही नागरी सुविधा दिल्या गेल्या नाहीत. यामध्ये प्रामुख्याने जलकुंभ, रस्ते, शाळा, गटारे, हॉस्पिटल, मैदाने, समाजमंदिर, व्यायामशाळा, वाचनालय अशा सुविधा अद्याप दिल्या गेल्या नसल्याने येथील जनता आधीच त्रस्त आहे. म्हणून या प्रकल्पाला सर्वांचा विरोध आहे. सिडकोने प्रथम येथील जनतेला सुविधा द्याव्यात, येथे अनेक वर्षांपासूनची जी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे त्याचबरोबर जी काही गोरगरीब लोकांची राहती घरे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे हात न लावता हा प्रकल्प गावापासून दूर करावा. याशिवाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व भोवताली बाग-बगीचा, शिवसृष्टी तयार करणे यासाठी खारकोपर रेल्वेस्थानकाजवळ सात एकर जमीन लवकरात लवकर तातडीने हस्तांतरित करून या सर्वांचा नियोजनबद्ध विकास करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्याला सिडको अधिकार्यांनी सकारात्मक उत्तर दिले आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू, असा शब्द त्यांनी बैठकीत सर्वपक्षीय समितीला दिला.
दरम्यान, शेलघर आणि जासईत जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी मुंबईतील घाण (डेब्रिज) खूप मोठ्या प्रमाणात आणून खाली केली जात आहे. त्यामुळे आज आपल्याला मोठा डोंगर झालेला पाहायला मिळत आहे. याचा परिणाम येथील जनतेवर होत आहे. मोठ्या प्रमाणात रोगराई या ठिकाणी पसरत चालेली आहे. कोरोना या जीवघेण्या आजराला लोक बळी पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ते लक्षात घेता या ठिकाणी खाली होणारा डेब्रिज कायमस्वरूपी बंद करावा. या ठिकाणी जो डेब्रिज खाली केला जात आहे त्याचा ठेकेदार आहे अस्लम शेख यांच्यावर ताबडतोब कारवाई करून त्याच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी कडक ताकीद सिडको अधिकार्यांना या बैठकीत देण्यात आली.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …