Breaking News

द्रुतगती मार्गावर खोल दरीत कार कोसळली; तीन जण गंभीर जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

बोरघाट उतरताना आडोशी गावाच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (दि. 8) दुपारी इरटीका कार द्रुतगती मार्गाच्या लोखंडी पट्टीचे संरक्षक कठडे तोडून 40 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

इरटीका कार (टीएस 08,जीएन-1219) द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे जात होती. शुक्रवारी दुपारी  दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बोरघाटातील आडोशी गावाच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. आणि  कार द्रुतगती मार्गाचे संरक्षक कठडे तोडून 40 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात कारमधील मधुकर रेड्डी (वय 23), रामकृष्ण रेड्डी (वय 22) व लवकुमार रेड्डी (वय 23, सर्व रा. हैद्राबाद)  गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळतात बोरघाट पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक निरीक्षक योगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयआरबीचे देवदूत पथक, मृत्युंजय पथक तसेच अपघातग्रस्त मदत पथकाचे सदस्य तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना दरीतून बाहेर काढले. तिनही जखमींच्या हातापायास गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांना निगडी (पुणे) येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply