भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
अलिबाग : प्रतिनिधी
रेवस-आवरे पोर्ट प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जमिनी पून्हा मूळ शेतकर्यांच्या नावे करण्याची मागणी भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 15) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून केली.
भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबईत राज्यपालांची भेट घेतली. रोजगार निर्मिती आणि औद्योगिकीकरणाला चालना मिळावी, या उद्देशाने अलिबाग तालुक्यातील भूमीपुत्रांनी अत्यंत विश्वासाने रेवस-आवरे पोर्ट प्रकल्पासाठी सुमारे 1200 हुन अधिक एकर जमीन दिली. मात्र तेथे कोणताही प्रकल्प आलेला नाही. या जमिनीवर खारेपाणी शिरल्याने त्या नापीक झाल्या आहेत. ना शेती, ना रोजगार यामुळे आज या विभागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या शेतकरी भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि जमिनी पून्हा मूळ शेतकर्यांच्या नावे कराव्यात, या प्रमुख मागण्या भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या समोर मांडल्या.
अॅड. महेश मोहिते यांच्या समवेत कृती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे, उपाध्यक्ष तथा सरपंच कुर्डुस अनंत पाटील, सरपंच मानकुळे सुजित गावंड, मनोज म्हात्रे, रतिकांत पाटील, रमाकांत म्हात्रे, सचिन डाकी या वेळी उपस्थित होते.