सीकेटी महाविद्यालयात होणार रायगडसाठीचे ऑडिशन
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून, राज्य शासनामार्फत ‘पुल’ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांतर्गत ‘पुल’ यांच्या साहित्यावर आधारित स्टँड-अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे रायगड जिल्ह्यासाठीचे ऑडिशन खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात 24 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर पात्र ठरणार्या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील विनोदी कलावंतांचे टॅलेंट हंट करण्याचा प्रयत्न स्पर्धेच्या निमित्ताने राज्य शासन करणार आहे. स्पर्धेच्या जिल्हास्तरीय फेर्यांना सुरुवात होणार असून, प्रत्येक केंद्रावरील विजेत्याला 20 हजार व उपविजेत्याला 15 हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येतील. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर सकाळी 10 ते दुपारी 2 व दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत स्पर्धा होतील. इच्छुक स्पर्धकांनी 7506848055 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर दोन मिनिटांचे सादरीकरण चित्रित करून पाठवायचे आहे. यातून निवडण्यात आलेल्या स्पर्धकाला केंद्रावर सात ते आठ मिनिटे सादरीकरण करावयाचे आहे. या स्पर्धेची सुरुवात 16 जुलैपासून नाशिक येथून झाली असून, 25 ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सोहळा रंगणार आहे.
संपूर्ण उपक्रमाचे प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनीवरून केले जाणार असून, महाराष्ट्रातील विनोदी कलावंतांना राज्यस्तरीय व्यासपीठ देण्याच्या हेतूने स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेचे नियम, अटी व अधिक माहिती ही http://www.sonymarathi.com/PLDeshpande2019 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेस भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. सीकेटी महाविद्यालयात होणार्या ऑडिशनच्या सहभाग, तसेच अधिक माहितीसाठी स्पर्धेचे रायगड जिल्हा समन्वयक डॉ. राजेश येवले (9819149665) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांनी केले आहे.