चार तासात आरोपी जेरबंद
पेण ़: प्रतिनिधी
पेण खाटीक आळी येथील सुवर्ण कारागिराच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी पेण पोलिसांनी पनवेलमधून दोन जणांना अटक केली आहे.
सुमन विरेंद्र बेरा (वय 26) यांचा पेण खाटीक मोहल्ल्यात सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे काम झाल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने कपाटामध्ये ठेवले. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास या बंद दुकानाच्या खिडकीची काच तोडुन व लोखंडी ग्रील उचकून दोन चोरट्यांनी कपाटामधील 12 लाख 52 हजार 150 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
या प्रकरणी सुमन विरेंद्र बेरा यांनी गुरुवारी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर चार तासात पोलिसांनी पनवेल येथील दोन आरोपींना अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक समद बेग करीत आहेत.