43 स्थानकांना भेटी व 1665 किमीची मजल
कर्जत : प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाने 1 जुलैपासून विविध स्थानकांवर ’आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागांमध्ये बाइक रॅली सुरू झाल्या आहेत. बाईक रॅलींनी मध्य रेल्वेवरील एकूण 1665 किमी अंतरावरील 43 स्थानकांना भेट दिली. कर्जत रेल्वे स्थानकात भर पावसात या बाईक रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या सर्व बाइक रॅली मुंबई येथे एकत्र येतील आणि स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगष्ट रोजी नवी दिल्लीला निघतील.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले पुल्लिंग तेवत राहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमाणसात राहावी या उद्देशाने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यालाच अनुसरून मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाचे सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या बाईक रॅलीचे नुकतेच कर्जत रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. सदर बाईक रॅलीमध्ये एकूण पाच बुलेट गाड्या व दहा जवान सहभागी झाले होते. त्यांचे कर्जत रेल्वे स्थानकातर्फे आरपीएफ आयपीएफ अनिल वर्मा, उपनिरीक्षक मगन खिलारे तसेच जय अंबे माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. आरपीएफ सहायक पोलीस निरीक्षक आर. सी. कुंतल, सहाय्यक उपनिरीक्षक गायकवाड यांच्यासह कर्जत रेल्वे स्टेशन मास्तर, आरपीएफ, जिआरपी कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर बाईक रॅलीचे बदलापुरकडे प्रस्थान झाले.