Breaking News

नवी मुंबईत बेकायदा फेरीवाल्यांची गर्दी

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे आरोग्य धोक्यात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई शहरात फक्त 7226 अधिकृत परवानाधारक फेरीवाले असून कोरोनाकाळातील आर्थिक संकटानंतर बेकायदा फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. ऐन पावसाळ्यात बेकायदा मटनशॉप तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नवी मुंबईतील सर्वच विभागांत एकही रस्ता, चौक असा नाही की तेथे फेरीवाले व्यवसाय करीत नाहीत. असे असताना पालिका या फेरीवाल्यांना अभय का देत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 2017 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या 7226 इतकी आहे. नवी मुंबई शहरात आतापर्यंत बेकायदा फेरीवाल्यांकडून पालिका कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक पथकातील व्यक्तींना मारहाणीच्या अनेक घटनासमोर आल्या आहेत.

नवी मुंबई शहरातील आठ विभागात मोठया प्रमाणात बेकायदा फेरीवाल्यांनी ठाण मांडलेले पाहावयास मिळते. सध्या पावसाळयाच्या दिवस सुरू असताना विविध साथीच्या रोगांना आमंत्रण देण्याचे काम उघडयावरील खाद्यपदार्थ विक्रेते करत असून बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या सर्वच विभागात फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढत आहेत. बेकायदा मटनशॉपही उदयास आली असून त्याच्या दरुगधीतून आरोग्याचे प्रश्न उभे राहू लागले आहेत.  वाशी सेक्टर 9,10 परिसरातही फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे.

शहरात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने विभाग कार्यालयाअंतर्गत कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. तसेच या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी या पथकाबरोबर सुरक्षारक्षकही नेमलेले असतात. त्यांच्या संरक्षणात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. कारवाई करण्यासाठी पालिकेची गाडी येणार याची माहिती फेरीवाल्यांना अगोदरच मिळते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी फेरीवाल्यांच्या कारवाईबाबत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नेरुळ, सीवूड्स, वाशी, कोपरखैरणेसह विविध विभागात पदपथ व्यापणार्‍या फेरीवाल्यांकडून नागरिकांवर दादागिरी करण्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

शहरात परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या 7226 आहेत व अनेक फेरीवाल्यांची नोंदणी फेरीवाला धोरणानुसार प्रक्रियेत आहे. तसेच फेरीवाले व बेकायदा मटन व इतर दुकाने याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.

-श्रीराम पवार, उपायुक्त परवाना

विभागवार अधिकृत फेरीवाले

                बेलापूर                   654

नेरुळ                     964

वाशी                    1130

तुर्भे                      1139

ऐरोली                    612

दिघा                       351

घणसोली               648

कोपरखैरणे           1828

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply