Breaking News

पेण अर्बन बँक घोटाळ्याची दशकपूर्ती; खोपोलीत संघर्ष समितीची निदर्शने

खोपोली : प्रतिनिधी
बहुचर्चित पेण अर्बन बँक घोटाळ्यास 10 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँक संघर्ष समितीने अध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली खोपोली शाखेसमोर गुरुवारी (दि. 24) सकाळी जोरदार निदर्शने केली. या वेळी घोटाळेबाजांचा तीव्र निषेध करण्यात आला.
संघर्ष समितीचे काम करताना जे जे कार्यकर्ते मृत्यू पावले त्यांना प्रारंभी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष व पालिकेतील गटनेते सुनील पाटील, ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर, विकसक शिरीष बिवरे यांनी ठेवीदारांना मार्गदर्शन केले. वक्त्यांनी संघर्ष समितीच्या लढ्याचा इतिवृत्तांत सांगितला. घोटाळ्यातील सर्व आरोपींना राज्य शासनाने अटक करावी, अशी जोरदार मागणीही या वेळी करण्यात आली. संघर्ष समितीचे आणखी एक नेते बाबूभाई ओसवाल यांनी तर बँक लवकरच सुरू होणार आहे व खोपोलीला पूर्वीप्रमाणे चांगले दिवस येऊन ठेवीदारांना न्याय मिळणार असल्याचे सांगितले.
जोडे मारून निषेध
बँकेच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या निषेध बॅनरवरील घोटाळेबाजांच्या फोटोस संघर्ष समितीचे नेते व कार्यकर्ते व ठेवीदारांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला. ‘बँक आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ या व ठेवीदारांनी दिलेल्या इतर घोषणांनी या वेळी बाजारपेठ दणाणून गेली. या निषेध आंदोलनाला मोठ्या प्रमाणात विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचप्रमाणे बँकेच्या ठेवीदारांनी गर्दी केली होती.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply