कर्जत : प्रतिनिधी
देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना वृक्षारोपण व संवर्धन मोहीम महत्वाची आहे. या मोहिमेत पर्यावरण राखण्यासाठी आपण या परिसरात सुमारे सहा हजार देशी झाडे लावत आहोत, असे प्रतिपादन कोंकण विभागाचे महसूल उपायुक्त मनोज रानडे यांनी तिघर धनगरवाडा येथे केले.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंकण विभाग विभागीय आयुक्त कार्यालय रोहयो शाखा आणि कर्जत तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तिघर धनगरवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर रायगड जिल्ह्यातील वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी महसूल उपायुक्त रानडे बोलत होते. उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. या वेळी रोहयो उपायुक्त वैशाली राज चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुलांना पर्यावरणाचे महत्व समजावे म्हणून हा वृक्षारोपणाचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पुढच्या पिढ्यांनी ही परंपरा कायम ठेवणे गरजेचे आहे, असे मत वैशाली राज चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केले. आंबा, कांचन, शिरस, बकुळ, कडुनिंब, पेरू, आवळा, वड, पिंपळ या देशी झाडांचे या वेळी वृक्षारोपण करण्यात आले. कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी एरकुडे, कृषी अधिकारी शीतल शेवाळे, क्षितिजा साळुंखे, संगीता पवार, प्रियांका गाडे, वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण, विरेंद्रसिंग परदेशी, पंजाब पवार, अमृता पोफळे, संतोष जांभळे, समीर खेडकर, सरपंच जयेंद्र देशमुख, उपसरपंच मनीषा गोरे, अॅड. वसंत रवणे, भिसेगाव केंद्र प्रमुख नलिनी साळोखे, संतोष देशमुख आदींसह वनविभागाचे कर्मचारी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.