नवी मुंबई : बातमीदार
देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन सर्वांना मोठ्या अभिमानाने साजरा करता यावा. यासाठी वाशीगाव, वाशी सेक्टर-30, सानपाडा- सोनखारमधील सर्व सेक्टर्स तसेच जुईनगर सेक्टर 22, 22 मधील प्रत्येक घरोघरी अश्या एकूण 15 हजार घरांमध्ये 13 तारखेपासून राष्ट्रध्वज फडकला जाणार आहे. या 15 हजार घरांमध्ये तिरंगा पोहोचवला जाणार आहे. माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली निशांत भगत, वैजयंती भगत आणि संदिप भगत यांच्या प्रत्यक्ष सहभागातून तिन्ही प्रभागातील युवक कार्यकर्ते, महिला भगिनी व जेष्ठ नागरिक् यात सहभागी झाले आहेत. हर घर तिरंगा सोबतच अमृतमहोत्सवी शुभेच्छापत्रे व प्रत्येक घरात स्मरणपर टेबल स्टँडी पोहचवली जाणार आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सानपाडा सेक्टर 16 येथील गुणीना मैदानात तिन्ही प्रभागातील नागरिकांच्या उपस्थिती एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक व विविध खेळांतील खेळाडू आणि व्यावसायिक त्याचप्रमाणे नागरिक हे अमृतमहोत्सवानिमित्त एकात्मतेचा संदेश मानवी आरास करून व देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजनानातून देणार आहेत. तसेच पामबीच (सोनखार) जेष्ठ नागरिक सेवा समितीच्या वतीने सोनखार विभागात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जनजागृतीपर प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर वाशीगाव येथील स्व. प्रेमनाथ पाटील चौकातून सानपाडा-सोनखारपर्यंत मोटर बाईक रॅलीचे आयोजनदेखील करण्यात आलेले आहे.