Breaking News

कर्जत, नेरळ, खालापूर पोलीस ठाण्यात ‘महिलाराज’

कर्जत : बातमीदार

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान करण्यासाठी पोलीस दलाने मंगळवारी (दि. 8) सर्व कारभार महिला पोलिसांच्या हाती दिला होता. कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यात महिला पोलिसांनी अगदी चोख कामकाज करीत सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले. कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यामधील सर्व कामकाज महिला कर्मचार्‍यांनी पाहिले. त्यात ठाणे अंमलदार म्हणून हवालदार स्वाती मसगुडे यांनी तर वायरलेसची जबाबदारी पोलीस शिपाई पूनम ढोमे यांनी पार पाडली. यावेळी सीसीटीएनएस प्रणालीवर  पोलीस नाईक संजना सांगळे यांनी तर दामिनी पथकाची जबाबदारी पोलीस शिपाई जया खंडागळे यांनी सांभाळली. गोपनीय विभाग  पोलीस शिपाई श्रुती भोईर यांनी तर शहर आणि परिसरातील बंदोबस्त पोलीस हवालदार संचिता सानप, पोलीस नाईक दीपा खडे, पोलीस शिपाई ज्ञानिवंता बारोळे आणि स्वाती चिरमे यांनी सांभाळला. नेरळ पोलीस ठाणे आणि कळंब आऊट पोस्ट पोलीस ठाणे येथीलही सर्व कामकाज महिला पोलिसांच्या हाती होते. नेरळ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी काम पाहिले.  ठाणे अंमलदार म्हणून पोलीस नाईक अनघा पाटील, सीसीटीएनएस प्रणालीवर पोलीस शिपाई सोनू मेश्राम यांनी तर वायरलेसची सेवा पोलीस शिपाई जयाबाई सांगळे यांनी सांभाळली. दामिनी पथकाची जबाबदारी  पोलीस शिपाई प्रीती वर्तक आणि वर्षा पाटील यांनी तर लॉकअप बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस शिपाई मोहिनी वाघमोडे, पोलीस नाईक रुतीका कदम आणि पुष्पा वाघमारे यांनी यशस्वीपणे सांभाळली. कळंब येथील आऊट पोस्टवरील प्रभारी म्हणून पोलीस हवालदार विद्या राठोड यांनी काम पाहिले. नेरळ पोलीस ठाणे आणि विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गावात प्रभातफेरी काढली होती. यावेळी महिला दक्षता समितीच्या सदस्या सुमन लोंगले, कल्पना हिलाल आणि रेखा हिरेमठ यांनी महिला पोलीस अधिकार्‍यांचे  कौतुक केले.

खालापूर :  महिला दिनानिमित्त खोपोली पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी मंगळवारी श्रुती सागर शेवते या पोलीस कन्येला देण्यात आली होती. तर पोलीस उपनिरीक्षक सरला काळे यांच्यावर खालापूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आला होता. खालापूर पोलीस ठाण्यातर्फे महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले तसेच महिला पत्रकार सारिका सावंत, सहजसेवा फाउंडेशनच्या इशिका शेलार, कराटेपट्टू शीतल गायकवाड, भक्ती साठेलकर यांच्यासह कर्तृत्ववान महिलांना गौरविण्यात आले. प्रभारी अधिकारी सरला काळे, खालापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, दिपाराणी विभूते, शिवानी जंगम, सुप्रिया साळुंखे, वर्षा मोरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लतिका गुरव यांनी केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply