पनवेल : वार्ताहर
पनवेलजवळील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे मुंबई लेनला 7-700 किमी अंतरावर एका उभ्या इको गाडीला पाठीमागून आलेल्या टाटा मांझा, आयशर टेम्पो व टाटा टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक व्यक्ती ठार झाल्याची घटना पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
आज पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कोणत्याही प्रकारे वाहतुकीचे नियम पालन न करता अमित राजू सदारंगानी याने त्याच्या ताब्यातील इको गाडी क्र. (एमएच 02, सीव्ही 9236) ही उभी ठेवली असताना पाठीमागून टाटा मांझा गाडी क्र. एमएच 03 बीई 9163, आयशर टेम्पो गाडी क्र. (एमएच 04, एचडी 1124), तसेच टाटा टेम्पो गाडी क्र. (एमएच 25, एजे 8686) याने धडक दिल्याने या वेळी टाटा टेम्पोचा चालक हाशीनशहा बाबुलाल मकानदार (30) याने त्याच्या पुढील गाडीला धडक दिली असता या अपघातात श्रवण रामसुरत सोनी (26) हा मयत झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण व पोलीस हवालदार सचिन गोसावी हे घटनास्थळी पोहोचले. याबाबत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली चौधरी करीत आहेत.