Breaking News

चार मतदान केंद्रांच्या अध्यक्षांवर कारवाई

पनवेल : बातमीदार

मतदान केंद्रांवर कामात हलगर्जी केल्याबद्दल चार केंद्राध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील चार वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर घडलेल्या प्रकारामुळे पनवेलच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.

29 एप्रिल रोजी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानप्रक्रिया झाली. पनवेल विधानसभा मतदारसंघात राज्यातील सर्वात जास्त 584 मतदान केंद्र होती. निवडणूक प्रक्रिया चोखपणे पार पाडावी म्हणून विविध विभागांतील सरकारी कर्मचार्‍यांवर जबाबदारी देण्यात आलेली असते. मतदान प्रक्रिया अचूक पार पडावी यासाठी दोन ते तीन वेळा प्रशिक्षणदेखील देण्यात येते. तरीदेखील पनवेल विधानसभा मतदारसंघातील चार मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आली नाहीत. मतदान प्रक्रियेनंतर आठ दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला असून, पनवेलचे निवडणूक क्षेत्रीय अधिकारी नालंद गांगुर्डे यांच्या आदेशाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तळोजा पाचनंद केंद्र क्रमांक 27चे कौस्तुभ भाटवडेकर, आडिवली केंद्र क्रमांक 330चे केंद्राध्यक्ष युवराज निकम, विहिघर केंद्र क्रमांक 511चे किशोर चौधरी, पालिदेवद केंद्र क्रमांक 518चे वासुदेव रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेच्या कामात हलगर्जी करीत दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply