मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 29) पदभार स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. या प्रक्रियेची पहिली पायरी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी
(दि. 29) उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात व नितीन राऊत हेही सोबत होते.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नव्या सरकारला 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत आहे, मात्र फार वेळ न दवडता विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा नव्या सरकारचा मानस आहे. बहुमत चाचणीसाठी शनिवारी (दि. 30) विधानसभेचे सत्र होणार आहे.