
पनवेल : बातमीदार
शहराच्या अनेक भागांत विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत. त्यामुळे पनवेलकर पैसे मोजून आजार विकत घेताहेत. नफा कमावण्यासाठी शहरात शुद्ध पाण्याचा काळा धंदा जोरात सुरू आहे. शहर व ग्रामीणच्या अनेक भागात विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईला पुढे येत नाही. याचाच गैरफायदा हे अवैध पाणी विक्रेते घेत आहेत. 90 टक्के आजार हे अशुद्ध पाण्यामुळे होतात, असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे घराबाहेर वा प्रवासात असताना प्रत्येकजण शुद्ध पाण्याच्या शोधात असतो. त्यासाठी बाटलीमागे 20 ते 30 रुपये मोजत असतो, परंतु पैसे मोजूनही त्याला अशुद्ध पाणीच प्यावे लागत आहे. परिसरात अनेक ठिकाणी बाटलीबंद आणि कॅनमधून पिण्याचे पाणी पुरवणारी प्रतिष्ठाने गल्लोगल्ली सुरू झाली आहेत. शहर व ग्रामीण भागात जवळपास शंभरहून अधिक विनापरवाना पाणी विक्रेते आहेत. या व्यवसायात मिळणार्या प्रचंड नफ्यामुळे अनधिकृत कंपन्यांची संख्या दररोज वाढत आहे. सरासरी 20 रुपये प्रतिबाटली दराने पाणी विकणार्या या कंपन्या एक बाटली पाण्यामागे केवळ एक ते दोन रुपये खर्च करतात. 20 लिटरची पाण्याची कॅन 70 रुपयात विकत असून त्यामागे 50 रुपयांचा थेट नफा ते कमावतात. शिवाय एक लिटर पाण्याच्या बाटलीच्या प्लॅस्टिकची तपासणी होत नसल्याने पाण्याच्या शुद्धतेवरही प्रश्न कायम आहे. या पाण्याची तपासणी नियमित होत नसल्याने हे पाणी जीवघेणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाढदिवस, लग्नसमारंभात सर्रास वापर
वाढदिवस आणि लग्न समारंभात कॅनचे थंड पाणी ठेवण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. केवळ 50 रुपयात 20 लिटरची पाण्याचा कॅन सहज उपलब्ध होत असल्याने नागरिक हाच पर्याय वापरतात. थंडगार पाणी मिळत असल्याने कोणीही त्याच्या शुद्धतेबद्दल विचार करत नाही, मात्र केवळ आरओ प्लांटची परवानगी घेऊन ते पाणी विकले जात आहे. या पाण्याची कोणतीच तपासणी होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper