सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेलमध्ये कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र वाढविण्यात यावीत, तसेच खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
नवीन पनवेल येथे लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत प्रभाग समिती ’ड’ सभापती सुशिला जगदिश घरत यांनी, तर खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले.
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड-19) या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून, या विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये याकरिता केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. याच धर्तीवर कोरोना विषाणूची लागण अन्य व्यक्तींना होऊ नये यासाठी पनवेल महापालिका प्रशासनामार्फत योग्य ती कायदेशीर उपाययोजना केली जात आहे, मात्र पनवेल महापालिका हद्दीतील सद्यस्थिती पाहता रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
नवीन पनवेल येथील लसीकरण केंद्रावर दिवसाला 100 ते 125 नागरिकांचे दैनंदिन लसीकरण करण्यात येत आहे, परंतु केंद्राबाहेर दर दिवशी 300 ते 400 नागरिकांची गर्दी दिसून येते. त्यामध्ये फक्त 100 ते 125 नागरिकांचे टोकन मिळून फक्त त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित नागरिकांना टोकन न मिळाल्याने पनवेल महापालिका प्रशासनाबद्दल असंतोष निर्माण होत आहे. या उद्भवणार्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनामार्फत नवीन पनवेल परिसरात दोन लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना लसीकरण करण्याकरिता होणारा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, तसेच नागरिकांना लसीकरणाबाबत जनजागृती करण्याकामी प्रोत्साहित करावे, जेणेकरून कोरोनाबाधित रुग्णांना त्यापासून वेळेत उपचार घेता येतील, तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही व नागरिकांना त्यापासून आधार मिळेल. याचबरोबर खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांना पनवेल, कळंबोली, नवीन पनवेल येथे लसीकरणासाठी जावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक भूर्दंड, व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, असेही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.