मागील लेखातील डाऊ थिअरीनंतर आजच्या लेखात आपण एलियट वेव्ह थिअरीबद्दल जाणून घेणार आहोत. हा असा अजून एक सिद्धांत आहे ज्याला ’आधुनिक’ म्हटलं जातंय. अमेरिकन अकाउंट आणि लेखक राल्फ नेल्सन एलियट यांनी हा सिद्धांत मांडला.
इलियटचा जन्म मेरीसविले, कॅन्सस इथं झाला आणि नंतर ते सॅन अँटोनियो, टेक्सास इथं गेले. 1890 च्या मध्यात त्यांनी लेखा क्षेत्रात प्रवेश केला आणि प्रामुख्याने मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमधील रेल्वेमार्ग कंपन्यांसाठी कार्यकारी पदांवर काम केलं. काही काळानंतर, त्यांनी मध्य अमेरिकेतील सामाजिक आणि आर्थिक समस्यांबद्दल दोन पुस्तकं लिहिली. टी रूम आणि कॅफेटेरिया मॅनेजमेंट आणि दी फ्युचर ऑफ लॅटिन अमेरिका. दुर्दैवानं, मध्य अमेरिकेत काम करत असताना, त्यांना आतड्यांसंबंधीचा आजार झाला ज्यामुळं त्यांना सेवानिवृत्ती घेण्यास भाग पडलं, जी गोष्ट पुढं तांत्रिकी विश्लेषण समुदायाच्या अप्रत्यक्षपणे पथ्यावर पडली. लागलीच त्यांनी अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकी शेअर बाजाराच्या निर्देशांकाचा 75 वर्षांच्या आकडेवारीचा (वार्षिक, मासिक, साप्ताहिक, दैनिक, तासांगणिक आणि अगदी अर्ध्या तासाच्या आलेखासह) अभ्यास केल्यानंतर त्यांना वेव्ह प्रिन्सिपल, व्यापारी मानसशास्त्राच्या चक्रीय स्वरूपाचं वर्णन आणि तांत्रिक विश्लेषणाचा एक प्रकार विकसित करण्यास प्रवृत्त केलं.
1929-1932 दरम्यान अमेरिकन प्रमुख निर्देशांक डाऊ जोन्स अॅव्हरेज त्याच्या उच्चांकापासून 89% कोसळला होता आणि या द ग्रेट डिप्रेशनच्या आठवणी त्यांच्या मनात ताज्या झाल्यामुळं सर्व आर्थिक सल्लागार नकारात्मक होते. 13 मार्च 1935च्या बुधवारी अमेरिकी शेअर बाजार बंद झाल्यानंतर डाऊ जोन्स अॅव्हरेज दिवसभराच्या नीचांकाच्या जवळ बंद झाली होती. एलियट यांनी आपल्या वेव्ह थिअरी विश्लेषणाचा हवाला देत कॉलिन्सला एक टेलिग्राम पाठवला आणि स्पष्टपणे सांगितले की, “NOTWITHSTANDING BEARISH (DOW) IMPLICATIONS ALL AVERAGES ARE MAKING FINAL BOTTOM” (डाऊ जोन्स मंदीमध्ये असूनदेखील सर्व सरासरी (निर्देशांक) अंतिम तळ बनवत आहेत.
दुसर्याच दिवशी, 14 मार्च 1935 रोजीचा बंद भाव हा डाऊ इंडस्ट्रीअल्स साठी त्या वर्षातील नीचांकी होता. 13 महिन्यांचे किंमत-सुधार (करेक्शन) संपलं आणि बाजार लगेचच वरच्या दिशेनं वळला. दोन महिन्यांनंतर, बाजारानं वरच्या दिशेनं वाटचाल सुरू ठेवल्यानं कॉलिन्स यांनी वेव्ह थिअरीवरील पुस्तकासाठी सहयोग करण्यास सहमती दर्शविली. वेव्ह प्रिन्सिपल 31 ऑगस्ट 1938 रोजी प्रकाशित झालं. त्यात, त्यांनी असा सल्ला दिला की, जरी स्टॉक मार्केट ट्रेंड यादृच्छिक (random) आणि अंदाज न लावण्याजोगे (unpredictable) भासत असले तरी ते अंदाजयोग्य, नैसर्गिक नियमांचे पालन करणारे आणि फिबोनाची संख्या वापरून मोजले आणि त्याचे अंदाज केले जाऊ शकतात.
1940 च्या सुरुवातीच्या काळात, ही वेव्ह थिअरी विकसित होत राहिली. एलियट यांनी सामूहिक मानवी वर्तनाचे नमुने फिबोनाची किंवा गोल्डन रेशोशी जोडले, ही एक गणितीय घटना आहे जी हजारो वर्षांपासून निसर्गाच्या स्वरूप आणि प्रगतीच्या सर्वव्यापी नियमांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या व्हॉल्यूममध्ये त्याच्या वेव्ह थिअरीबद्दलच्या जवळजवळ प्रत्येक विचारांचा समावेश आहे. या एलियटच्या अग्रगण्य संशोधनाचा परिणाम म्हणून, आज हजारो संस्थात्मक पोर्टफोलिओ व्यवस्थापक, व्यापारी आणि खासगी गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीच्या निर्णयामध्ये वेव्ह थिअरीचा वापर करतात. द वेव्ह प्रिन्सिपलच्या प्रकाशनाच्या एका वर्षाच्या आत, एलियटना फायनान्शियल वर्ल्ड मॅगझिनसाठी मार्केट ट्रेंडचे विश्लेषण करण्याच्या त्याच्या नवीन प्रणालीचे वर्णन करण्यासाठी 12 लेख लिहिण्यास सांगण्यात आलं. एका दशकानंतर त्यांनी सर्व सामूहिक मानवी वर्तनांना लागू करण्यासाठी त्यांच्या सिद्धांताचा विस्तार केला. नेचर्स लॉ-द सीक्रेट ऑफ द युनिव्हर्स हे महत्वाकांक्षी पुस्तक लिहिलं जे त्यांच्या मृत्यूच्या दोन वर्षांपूर्वी जून 1946 मध्ये प्रकाशित झालं.
या सिद्धांतांमुळं वित्तीय बाजारातील कल आणि त्यामधील उलथापालथ ओळखण्यास सहाय्य्य होऊ लागलं. बाजारातील विविध मालमत्ता प्रकारांच्या किंमतीच्या हालचालींमधील हे चक्रीय नमुने, या पद्धतीच्या अभ्यासकांमध्ये एलियट वेव्ह म्हणून ओळखले जातात. असा महत्वाचा अभ्यास करण्याआधी ज्या आधारांवर ही थिअरी आधारित आहे, त्या फिबोनाची आकडे किंवा फिबोनाची गुणोत्तरांबद्दल थोडं समजून घेऊ. वर उल्लेखलेला गोल्डन रेश्यो हा त्यातीलच एक भाग. फिबोनाची क्रम इटालियन गणितज्ञ लिओनार्डो फिबोनाची यांनी 13 व्या शतकात विकसित केला होता. शून्य व एकने सुरू होणारी, ही एक सतत वाढत जाणारी मालिका आहे जिथे प्रत्येक संख्या मागील दोन संख्यांच्या बेरजेइतकी असते. उदा. 0+1=1 मग 1+1=2 त्यानंतर 2 च्या आधीची संख्या 1 म्हणून 2+1=3, नंतर 3+2=5, 5+3=8, 8+5 =13 + 13+8 = 21, 21+13= 34 आणि पुढं. गणितामध्ये, फिबोनाची संख्या, सामान्यत: Fn2 दर्शविल्या जातात, एक क्रम तयार करतात ज्यास फिबोनाची क्रम किंवा सूत्र संबोधलं जातं. फिबोनाची क्रमातील संख्या एका विशिष्ट सूत्राशी समतुल्य नसल्या तरी, या संख्यांचा एकमेकांशी विशिष्ट संबंध असतो. सुवर्ण गुणोत्तर (गोल्डन रेश्यो):फिबोनाची मालिकेच्या प्रत्येक संख्येला त्याच्या आधीच्या संख्येनं विभाजित करून सुवर्ण गुणोत्तर प्राप्त केलं जातं. उदा. 34/21 = 1.619 ही संख्या जसजशी मोठी होत जाते, तसतसे फिबोनाची संख्यांच्या प्रत्येक सलग जोडीमधील भागांक अंदाजे 1.618 किंवा त्याचा व्यस्त म्हणजे 0.618 असतो. हे प्रमाण अनेक नावांनी ओळखलं जातं जाते. सोनेरी गुणोत्तर, सोनेरी सरासरी, ग्रीक वर्ण द्ध आणि इतरांमध्ये दैवी प्रमाण.
निसर्गातील बर्याच गोष्टींमध्ये मितीय गुणधर्म असतात जे 1.618 या गुणोत्तराचे पालन करतात, त्यामुळे निसर्गाच्या निर्मितीमध्ये देखील याचं मूलभूत कार्य असल्याचे आढळतं.
शतकानुशतके पूर्वी, अलौकिक बुद्धिमान लोकांनी आपल्या सभोवतालच्या सुंदर निसर्गाचे नमुने पाहण्यास सुरुवात केली आणि वनस्पतींमध्ये पानांच्या मांडणीपासून, फुलांच्या पाकळ्यांच्या नमुन्यापर्यंत, शंखाची रचनेपासून ते अननसाच्या खवल्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा नमुना समान होता. आणि ही रचना 1, 2, 3, 5, 8, 13, 21, 34, 55.. यांच्या गुणोत्तरातच राहते. 1.618 हे एक अद्वितीय गुणोत्तर आहे ज्याचा वापर निसर्गाच्या सर्वात लहान गोष्टीपासून,अणूंच्या रचनेपासून अकल्पनीय मोठ्या खगोलीय विवरांसारख्या विश्वातील सर्वात प्रगत नमुन्यांपर्यंत सर्व गोष्टींचे प्रमाण वर्णन करण्यासाठी केला जाऊ शकतो. समतोल राखण्यासाठी निसर्ग या जन्मजात प्रमाणावर अवलंबून असतो. याच गुणोत्तरावरून फिबोनाची स्पायरल हा प्रकार विकसित झाला. जेव्हा तुम्ही एका रेषेला दोन भागांमध्ये विभाजित करता तेव्हा तुम्हाला सुवर्ण गुणोत्तर आढळू शकतं आणि मोठा भाग (र) लहान भाग (ल) ने भागलेला (र) + (ल) (र) ने भागलेल्या बेरजेइतका असतो, जे दोन्हीची बेरीज 1.618 येते. आकार, लोगो, मांडणी आणि बरेच काही तयार करताना हे सूत्र तुम्हाला मदत करू शकते. सुवर्ण गुणोत्तराची अजूनही अनेक उदाहरणं देता येतील, उदा. बिया, फुलांच्या पाकळ्यांची रचना, मधमाश्यांच्या पोळ्याची रचना, पाईनकोन्स, झाडांच्या फांद्या, शंखाची रचना, आकाशगंगांची रचना, चक्रीवादळाची रचना, चेहर्याची ठेवणं, डोळ्याची-कानांची रचना, इ. असं हे सुवर्ण गुणोत्तर नंतर वास्तुकला, चित्रे, शिल्पकला, छायाचित्रण, डिझाइन इत्यादीसाठी प्रमाण तयार करण्यासाठी वापरली गेली. आणि विशेष म्हणजे आर्थिक बाजार देखील या सुवर्ण गुणोत्तर नुसार आहे असंच सिद्ध झालंय. त्याबद्दल पुढील लेखात..
-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर