नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडकोतर्फे गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे, रेल्वे स्थानक संकुलांतील सहा कार्यालये व त्याचप्रमाणे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीच्या योजना सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे समाजातील विविध घटकांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत होईल. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली, सिडको सातत्याने घरे, भूखंड, दुकाने आणि कार्यालयांची (कमर्शियल प्रीमाईसेस) विविध योजनांद्वारे समाजातील सर्व घटकांना विक्री करते. महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4,158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 4,158 घरांपैकी 404 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित 3,754 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा 6,00,000 रुपये तर अनुदानाची रक्कम 2,50,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी सदर घरे असलेली गृहसंकुले वसलेली आहेत. या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इत्यादी सर्व सामाजिक सुविधाही उपलब्ध आहेत. इतर योजनांतर्गत सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण 245 वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत, तसेच नेरूळ रेल्वे स्थानक संकुल आणि जुईनगर स्थानक संकुल येथील प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण सहा कार्यालये (कमर्शिअल प्रीमाईसेस) विक्रीकरिता उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तारांकीत हॉटेलसाठी एक, निवासी वापरासाठी 64 तर निवासी तथा वाणिज्यिक वापरासाठी पाच भूखंड विक्रीकरीता उपलब्ध आहेत. या योजनांच्या माहितीकरिता https://www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध असून अर्ज नोंदणीपासून ते सोडती पर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पार पडणार आहेत. योजनांसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता अर्जदारांनी या संकेतस्थळास भेट द्यावी.