Breaking News

धोनी आयपीएलमध्ये खेळणार!

रांची : वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्ती घेणार की नाही याबद्दल चर्चा सुरू असल्या तरीही आयपीएलमध्ये धोनी पुढची काही वर्षे खेळत राहील हे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामाचा लिलाव आता जवळ येऊन ठेपला आहे. 19 डिसेंबर रोजी कोलकाता शहरात हा लिलाव होईल. अशात 2020च्या हंगामासाठी धोनीने स्वतःहून चेन्नईची साथ सोडण्याची तयारी दाखवली आहे. पुन्हा एकदा लिलावात उतरून स्वतःला कमी किमतीत पुन्हा विकत घेण्याचा पर्याय धोनीने संघमालकांना दिल्याचे कळते.

2020च्या आयपीएलसाठी मोठा लिलाव पार पडेल आणि धोनीने आम्हाला स्पष्ट केले आहे की तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्यामुळे टी-20 स्पर्धेतून त्याच्या निवृत्तीचा प्रश्नच उद्भवत नाही, मात्र गेली काही वर्षे चेन्नईचा संघ धोनीला कायम राखत आला आहे. इतर खेळाडूंनाही न्याय मिळावा यासाठी धोनीने स्वतः पुन्हा एकदा लिलावात उतरण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे चेन्नई धोनीवर पुन्हा बोली लावू शकते किंवा राईट टू मॅच कार्डाद्वारे संघ धोनीला पुन्हा आपल्याकडे कायम राखू शकतो. खुद्द धोनीनेच आमच्याकडे हा पर्याय दिला आहे, अशी माहिती चेन्नई सुपरकिंग्जच्या सूत्रांनी एका वृत्तपत्राला दिली. धोनी हा चेन्नई संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे आम्ही त्याला शक्यतो लिलावात उतरू देणार नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निवड समितीने आगामी टी-20 विश्वचषक लक्षात घेता धोनीला आता संघात स्थान मिळणार नाही हे पक्क केले आहे. धोनीऐवजी ऋषभ पंत सध्या मर्यादित षटकांच्या सामन्यात यष्टीरक्षकाची भूमिका बजावत आहे. मध्यंतरी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार की नाही हे त्याच्या आगामी आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून असेल, असे म्हटले होते. त्यामुळे आगामी काळात धोनी आपल्या निवृत्तीबद्दल कधी निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply