Breaking News

इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो टाकण्याची धमकी देणार्यास सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो टाकण्याची धमकी देणार्‍या एका आरोपीला अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. अहमर शराफतअली सिद्दीकी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो लखनऊ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे.

आरोपी अहमर सिद्दीकीने नागोठणे येथील एका अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. नंतर तिला अश्लील चॅटिंग करण्यास सांगितले. तसे न केल्यास तिचे आणि तिच्या मैत्रिणीचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड कऱण्याची धमकी दिली होती. सदर गुन्हा 30 ऑक्टोबर 2016 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला होता.

या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 354 ड (2) आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 66 आणि 67मधील पोटकलमानुसार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 11 (4) (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. रायगड पोलिसांच्या सायबर सेलमार्फत तपास करून अहमर शराफतअली सिद्दीकीविरोधात अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

या प्रकरणाची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. या वेळी सरकारी अभियोक्ता म्हणून अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान एकूण आठ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. यात फिर्यादी मुलगी, रायगडच्या सायबर सेल विभागाचे तत्कालीन प्रमुख प्रमोद बडाख, तपासिक अधिकारी पोलीस निरीक्षक एस. डी. भोसले यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि आरोपी अहमर शराफतअली सिद्दीकीला या प्रकरणात दोषी ठरवले. आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेतील 10 हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. रायगड जिल्ह्यात सायबर गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होण्याची ही पहिलीच मोठी घटना असल्याचे सांगितले जात आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply