सुखकर्ता, दुःखहर्ता गणरायाचे घरोघरी तसेच सार्वजनिक स्वरूपात आगमन झाले आहे. दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. गणपतीचा महिमा अगाध आहे. त्याच्या येण्याने चैतन्य पसरले असून चिंता, क्लेश, दुःख काही काळासाठी का होईना पण सारेजण विसरले आहेत. बाप्पा येताना सोबत भक्तगणांसाठी वर्षभराची ऊर्जा सोबत घेऊन आला आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधीपती असलेल्या गणरायाला अग्रपूजेचा मान आहे. कोणत्याही कार्यारंभी श्री गणेशाची पूजा-अर्चा, आराधना केली जाते. अशा या बाप्पाचा गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रातील सर्वांत मोठा उत्सव मानला जातो. भाविक यथाशक्ती दीड, पाच, दहा दिवस गणरायाची घरगुती तसेच सार्वजनिक स्वरूपात प्रतिष्ठापना करतात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा त्यामागे होती. स्वातंत्र्य मिळेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा समाजात रुजली आणि स्वातंत्र्यानंतरही या सणाचा उत्साह आणि चैतन्य कायम राहिला किंबहुना वृद्धिंगत होत गेला. गेली दोन वर्षे अवघ्या विश्वावर कोरोनाचे सावट होते. या महामारीने सर्वांनाच बेजार केले. अनेकांना त्याची लागण झाली, तर कित्येकांचा जीवही गेला. परिणामी सर्व सण-उत्सव नियम, अटींच्या अधिन राहून साधेपणाने साजरे झाले. गणेशोत्सवही त्याला अपवाद नव्हता. अखेर कोरोनारूपी विघ्न सरले आणि पुन्हा एकदा हर्षोल्हासात गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सवानिमित्त यंदा मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. जो तो आपापल्या परीने खरेदी करून बाप्पाची सेवा करीत आहे. बाप्पाच्या येण्याने वातावरण सकारात्मक झाल्याचे दिसून येते. एरवी माणूस कोणत्या ना कोणत्या चिंतेत असतो. दैनंदिन जीवनात व्यस्त असतो, परंतु गणपती आल्यावर आनंद पसरतो, विसावा मिळतो. यानिमित्ताने काम-धंद्यासाठी विखुरले गेलेले कुटुंब एकत्र येते. मग ख्याली-खुशालीची आपुलकीने विचारपूस होते. सुख-दु:खे वाटून घेतली जातात. पाहुणा आलेल्या गणपतीमुळे घर कसे एकवटून, आनंदून जाते. गणपतीपाठोपाठ त्याची आई अर्थात गौराईचे सोनपावलांनी आगमन झाले. गौरीमातेचे आगमनामुळे महिलावर्गात उत्साह पसरला. तिचेही यथासांग पूजन करण्यात आले. आता पाच दिवसांच्या बाप्पाचे सोमवारी गौरीमातेसह विजर्सन होईल. यानंतर लक्ष असेल ते सार्वजनिक गणेशोत्सवाकडे. हीसुद्धा एक छान परंपरा आहे. मंडळे, संस्था, संघटना, सोसायट्या एकत्र येत सार्वजनिक स्वरूपात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. चलचित्र देखाव्यांमधून सामाजिक संदेश दिले जातात. या कार्यात तरुणांपासून वृद्धांपर्यंत जो तो आपले योगदान देतो, सहकार्य करतो. दररोज मंडपात बाप्पाची सामुदायिक आरती केली जाते. विविध सामाजिक, आरोग्यदायी तसेच मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित केले जातात. यात सहभाग घेण्याचा अनुभव काही औरच. असा हा बाप्पा आपल्यासोबत बरेच काही घेऊन येत असतो. दहा दिवसांनी त्याचे विधीवत विसर्जन होते. ’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, असे म्हणत त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. प्रथेप्रमाणे बाप्पाचे विसर्जन केले जात असले तरी जाताना तो वर्षभराची ऊर्जा देऊन जातो.
उत्साहाला उधाण
Ramprahar News Team 4th September 2022 महत्वाच्या बातम्या, संपादकीय Leave a comment 213 Views
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper