भक्ती, संगीत आणि संस्कृतीचा सुरेल संगम
पनवेल ः रामप्रहर वृत्त
थोर दानशूर व्यक्तिमत्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त पनवेलमध्ये अप्रचलित रागांवर आधारित ७५ अभंगांचे भव्य लोकार्पण आध्यात्मिक वातावरणात झाले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने पनवेलच्या सांस्कृतिक परंपरेत भर घातली.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते रामशेठ ठाकूर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, गुरुवर्य पं. निवृत्तीबुवा चौधरी, नादब्रह्म साधना मंडळाचे अध्यक्ष वसंत पाटील, रायगड भूषण पं. उमेश चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी अप्रचलित आणि अनवट रागांवर आधारित सादर करण्यात आलेल्या अभंगांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. शास्त्रीय संगीताची गोडी आणि भक्तीभाव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेच्या जतन व संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. नवोदित कलाकारांना प्रेरणा आणि योग्य दिशा देणारा हा उपक्रम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भजनसम्राट पं. निवृत्तीबुवा चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत अभंगांची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिष्यवर्ग आणि संगीत अभ्यासकांना रागांची शास्त्रशुद्ध ओळख होण्यास मोठी मदत होणार आहे. शास्त्रीय संगीताच्या परंपरेतील रागसंवर्धन आणि सातत्यपूर्ण जतन हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असून या माध्यमातून भक्ती, संस्कार आणि संगीत यांचा सुंदर संगम समाजास अनुभवता येणार आहे.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे औक्षण करून त्यांना शतायुषी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या मनोगतात त्यांनी या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक व समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
भजनसम्राट पं. निवृत्तीबुवा चौधरी यांनी, आजपर्यंत प्रचलित रागांवर आधारित रचना आहेत, पण आता अप्रचलित रागांवर अभंग तयार करण्यात आले असून ते संगीतातील डॉक्टरेट पदवीसाठी उपयुक्त ठरणार आहेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिन्द्र पाटील यांनी केले.
पैसा, संपत्तीने फुगलेली हजारो माणसे मी बघितली आहेत, मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सर्व असतानाही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. लोकांची सदैव सेवा करणे आणि लोकांमध्ये मिळून मिसळून राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे ते फक्त लोकनेतेच नाही, तर लोकसेवक आहेत.
-भजन सम्राट पं. निवृत्तीबुवा चौधरी
RamPrahar – The Panvel Daily Paper