खारघर ः रामप्रहर वृत्त
खारघरमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात स्वाईन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजाराचे 50हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खारघर वसाहतीत आजही अनेक भागांत कचर्याचे ढीग, मलनिस्सारण वाहिन्यांच्या विविध समस्या असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असून पावसाळ्यापूर्वी वसाहतीमधील गटारांची साफसफाई केली गेली नसल्यामुळे अजूनही काही भागांत पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहरात डासांची उत्पत्ती वाढल्याने हिवताप, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. जुलै महिन्यात खारघरमध्ये स्वाईन फ्लूचा एक, डेंग्यूचे चार आणि मलेरियाचे आठ रुग्ण आढळून आले होते, तर ऑगस्ट महिन्यात हीच संख्या अनुक्रमे 13, 28 आणि 12 झाली आहे. गाव परिसर आणि वसाहतीमध्ये सध्या रुग्णवाढ होत आहे. खासगी रुग्णालयांतदेखील ताप, हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी धुरीकरण आणि फवारणी नियमितपणे केली जात असल्याचे सांगितले.