नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
गेल्या काही काळापासून भारतात मतदानासाठी वापरण्यात येणार्या ईव्हीएमबाबत सातत्याने शंका घेतल्या जात आहेत, मात्र येथील निवडणूक आयोगाचे काम आणि ईव्हीएमची कार्यप्रणाली पाहून प्रभावित झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आहे.
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे निरीक्षण केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या राजदूत म्हणाल्या की, भारतातील निवडणूक प्रक्रिया ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. सुव्यवस्थित निवडणूक आयोग आणि त्याचे प्रशिक्षित अधिकारी असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या मतदानाची व्यवस्था होऊ शकत नाही. ही एक चांगली आणि सुव्यवस्थित प्रणाली आहे.
या वेळी हरिंदर सिद्धू यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचेसुद्धा कौतुक केले. ईव्हीएम मशीनमुळे मी खूप प्रभावित झाले आहे. ऑस्ट्रेलियात अशी व्यवस्था नाही. मला वाटते की बॅलेट पेपर म्हणजेच जी प्रणाली ऑस्ट्रेलियात वापरली जाते, तिच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात, तसेच आता ईव्हीएमला नव्याने जोडण्यात आलेली व्हीव्हीपॅट मशीनची प्रणालीसुद्धा उत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मागील काही वर्षांपासून देशात ईव्हीएम प्रणालीबाबत विविध राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. काही राजकीय पक्षांनी तर ईव्हीएमला प्रखर विरोध केला होता. ही प्रणाली सत्ताधारी पक्षास लाभदायक ठरत असल्याचा सूर विरोधकांनी आळवला होता. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी ईव्हीएम प्रणालीबाबत केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.