पनवेल : बातमीदार
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तालुक्यातील हालटेप, ताडाचा टेप या आदिवासी वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर काही गाव व वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी आलेली असून तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील वसाहतीत पाणीटंचाई भासू लागल्याने अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तोसुद्धा अपुरा असून लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पनवेल तालुक्यात हजारोंच्या संख्येने आदिवासी कुटुंब राहतात. कुंबलटेकडी, ताडपट्टी, हौशाची वाडी, चिंचवाडी, गारमाळ, येरमाळ, भेकरे आदी गाव वाड्या या पाणीटंचाईने त्रस्त असल्याचे येथील नागरिक सांगतात.
पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून पाठविण्यात आलेला आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांत तालुक्यातील 17 गाव, तर 37 वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत चालला आहे. पनवेल तालुक्यातील अनेक गाव-पाडे काही प्रमाणात सद्यस्थितीत पाण्याच्या टंचाईने ग्रस्त आहेत. त्यामुळे गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी मार्च महिन्यापासूनच पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गारमाळ, बोंडरपाडा, सतीची वाडी, कुंबल टेकडी, चिंचवाडी, वाघाची वाडी, टावरवाडी आदी वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गारमाळ व बोंडरपाडा गावातील आदिवासींना तर तीन ते साडे तीन किलोमीटर पायी चालत जाऊन पाणी आणावे लागत आहे. तर काही आदिवासी बांधवांना फार्महाऊस मालक पाणी देत आहेत. मे महिना उजाडून 10 दिवस उलटले आहेत. त्यामुळे उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. पशूपक्षी देखील पाण्याच्या शोधात आहेत.
वारदोली ग्रामपंचायत हद्दीतील हालटेप व ताडाचाटेप या दोन वाड्यांवर 23 एप्रिलपासून दिवसाआड शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर आपटा ग्रामपंचायत येथील घेरा वाडी, माड भवन, कोरळ वाडी येथे टँकरची मागणी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी देखील टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियांता आर. डी.चव्हाण यांनी दिली, तर शिरवली, कोंडप, मोहोदर, कुत्तर पाडा या चार वाड्यांची पाहणी केलेली असून या ठिकाणी टँकरची मागणी करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीकडून तसा ठराव आला की त्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 2019 मध्ये कानपोली, गुळसुंदे, सावळे, कसळखंड, नारपोली, धोदानी, मालडुंगे, नेरे, वाकडी ही 9 गावे व गराडा, नेरेपाडा, कोरलवाडी या 3 वाड्यांतील विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करण्यात आली. यासाठी अंदाजे तीन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
- तालुक्यातील अनेक ठिकाणच्या हापशी (बोअरवेल) व विहिरी बंद अवस्थेत आहेत. त्यांची दुरुस्ती केल्यास त्याचा वापर करता येणे शक्य असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
ज्या गावासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी बिडीओकडे ठराव येईल, त्याची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याची टंचाई आहे की नाही याबाबतचा प्रस्ताव तयार करून प्रांत अधिकार्यांकडे पाठविणार आहोत. -आर. डी. चव्हाण, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती