पेण : अनिस मनियार
भोगावती नदी ही भोगेश्वरी येथून वाहत येते. ती पेण तालुक्यातील अकादेवी काळेश्री खाडीतून रेवसच्या खाडीला मिळते. काळेश्री अकादेवी हे तीन खाड्या मिळून बनलेले बेट आहे. या बेटातच अकादेवी मंदिर वसले आहे. आता या खाडीवर पूल बांधले गेले आहेत. काळेश्री येथील अकादेवी ही कोळी, आगरी बांधवांंच्या हाकेला धावणारी देवी आहे. या देवीचे मंदिर हे दीडशे वर्षांपूर्वीचे आहे. देवीची मूर्ती पाषाणाची असून ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे. शिवाजी महाराज अंतोरा बंदरातून जाताना ते काळेश्रीची अकादेवी, मोठे वढाव येथील बहिरी देवे आणि वाशीची वरसुबाय देवी यांचे दर्शन घेऊन पुढे जात असत. वाशीच्या देवीचे मूळस्थान मंदिरासमोरील तलावात असावे, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. तर अकादेवीचे स्थान तिच्या पाठीमागील खाडीमध्ये आहे, असे सांगितले जाते. अकादेवीच्या देवळासमोरच विरक्त झालेले ब्रह्मचारी सदाशिव पांडुरंग खरे महाराजांची तेथे समाधी आहे. सदाशिव खरे हे नवरात्रोत्सव काळात अकादेवीच्या मंदिरात कीर्तन करत असत. चैत्र शुद्ध चतुर्दशी, चैत्र पौर्णिमेला आणि अश्विन महिन्यात विजयादशमीपर्यंत नऊ दिवस अकादेवी देवीचा उत्सव असतो. या उत्सवात ठाणे, मुंबई व जवळपास परिसरातील भाविक येतात. पूर्वी अकादेवी ते मुंबई भाऊचा धक्का अशी मचवा प्रवाशी वाहतूक होत असे. अकादेवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.