आमदार रविशेठ पाटील यांनी केले स्वागत
पेण ः प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून करोटी ग्रामपंचायतीतील गावांचा विकास खुटला असल्याने येथील काही ग्रामस्थांनी आपल्या विभागाचा विकास साधण्यासाठी एकत्र येऊन रविवारी (दि. 6) आमदार रविशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गावढोशी येथील विक्रम मोरे यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. करोटी विभाग मोहिली खालसा, गावढोशी, जैतुची वाडी, घोटे, जांभूळवाडी, दरेगाव, दोडानी करोटी विभागातील प्रकाश कृष्ण निवळे, रविंद्र कदम, संतोष भोसले, विजय कदम, विक्रम मोरे, भिवाजी चव्हाण, गोविंद सकपाळ, दामा दरवडा, मंगळ्या कुर्राडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. काही दिवसांतच या विभागातील अनेक ग्रामस्थ भाजपात प्रवेश करणार असल्याचे या वेळी शिवाजी पाटील यांनी सांगितले, तसेच पक्ष संघटना वाढवण्यासाठी भाजपाशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून करोटी ग्रामपंचायत विभाग रस्ता, पाणी, शासकीय योजनांपासून वंचित आहे. सातत्याने मागणी करूनही सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे आपल्या विभागाचा विकास भाजपचे आमदार रविशेठ पाटील हेच करू शकतात, असे सांगत ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला. आमदार रविशेठ पाटील यांनी भारतीय जनता पक्षात करोटी ग्रामस्थांचे स्वागत करीत या भागातील विकासकामे करून येथील समस्या सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस शिवाजी पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.