सरोवर संवर्धन अभियानांतर्गत राजिप करणार सुशोभिकरण
अलिबाग ः प्रतिनिधी
पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलाशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी शासनाने सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 76 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभिकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जिवित करणे अशी कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. सरोवर संवर्धन अभियानांतर्गत एक एकर क्षेत्राचे नवीन तलाव निर्मिती करणे, तसेच एक एकर क्षेत्रात अस्तित्वात असणार्या तलावातील गाळ काढणे, सुशोभिकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जिवित करणे यांसह तलाव परिसरात वृक्षलागवड, शौचालय व्यवस्था ही कामे करण्यात आली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी 75 तलावांची कामे हाती घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरावरून अस्तित्त्वात असणारे 133 तलावांची अमृत सरोवर पोर्टलवर नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायत 15व्या वित्त आयोग माध्यमातून आणि शासनाच्या विविध योजना तसेच कंपन्यांच्या विकासनिधीतून 76 तलावांची कामे हाती घेण्यात आली होती. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, महिला बचतगट, नागरिक यांनी तलाव संवर्धन अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यातील 76 तलावांचे संवर्धन करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश मिळाले. यासर्व कामांचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा मृद व जलसंधारण विभागाकडे सादर केले जाणार आहे.
सर्वाधिक तलाव रोहा तालुक्यातील
रायगड जिल्ह्यातील अमृत सरोवर अभियानांतर्गत रोहा तालुक्यातील 13 तलावांचे संवर्धन करण्यात आले, तसेच अलिबाग चार, कर्जत एक, खालापूर आठ, महाड चार, माणगाव चार, म्हसळा सहा, मुरूड सहा, पनवेल नऊ, पेण चार, पोलादपूर दोन, श्रीवर्धन सहा, सुधागड चार, तळा एक, उरण चार तलावांचे संवर्धन करण्यात आले आहे.