पोलादपूर : प्रतिनिधी
येथील एसटी स्थानकामध्ये शुक्रवारी (दि. 15) रात्री ठाणे- चिपळूण बसचे पुढील चाक एका वृध्दाच्या दोन्ही पायांवरून जाऊन तो जखमी झाला. या अपघातप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये एसटी बस चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलादपूर बस स्थानकात शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास चिपळूण-ठाणे बस (क्र. एमएच13-सीयु6550) थांबली होती. बसमधील प्रवासी प्रकाश रघुनाथ देवळेकर (वय 68, रा. वेरळ-रेमजेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे लघुशंकेसाठी खाली उतरले होते. त्या वेळी चालक श्यामकांत मधुकर पगार याने बस सुरू केली. देवळेकर यांनी चालकास बस थांबविण्यासाठी हात केला असता त्यांना बसची धडक बसून ते खाली पडले. त्यानंतर बसचे पुढील चाक दोन्ही पायांवरून जाऊन देवळेकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी एसटी बसचालक श्यामकांत मधुकर पगार (31) याच्या विरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार व्ही. जी. मिंडे अधिक तपास करीत आहेत.