हिशेब मांडताना अधिकार्यांना अडचणी
अलिबाग ः रामप्रहर वृत्त
कोरोना काळात शासनातर्फे आरोग्य सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक तालुकास्तरावर आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. विलगीकरणात वाढीव खाटा, कोविड केंद्रात विशेष खाटा, व्हेंटिलेटर सुविधेसह ऑक्सिजन पुरवठ्याची यंत्रणा देण्यात आल्या. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला, मात्र आता दोन वर्षांनंतर ही आरोग्य सुविधा कुठे गेली, याचा लेखाजोखा संबंधित अधिकार्यांनाही मिळवण्यात अडचणी येत आहेत.
रायगड जिल्ह्यात कोविडसाठी 33 राखीव आरोग्य केंद्र, तर 17 राखीव केंद्र सुरू करण्यात आली होती. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात 10 व्हेंटिलेटरसह जिल्हाभरात 140 व्हेंटिलेटर देण्यात आले होते. सरकारी निधीबरोबरच जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी यासाठी भरीव सीएसआर निधी दिला होता. कालांतराने रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यावर गृहविलगीकरणात उपचार करून घेण्याची मुभा देण्यात आल्याने टप्प्याटप्प्याने सर्व सुविधा बंद करण्यात आल्या. त्यामुळे कोट्यवधींच्या अद्ययावत आरोग्य यंत्रणांचे काय झाले, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. याचे स्पष्ट उत्तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह जिल्हा शल्यचिकित्सकांकडेही नाही.
दोन्हीही विभागातून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या साहित्याचे पुढे काय झाले, याचे कोणतेही स्पष्ट उत्तर संबंधित अधिकार्यांकडे नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांत आल्यानंतर तपासणीनंतर बाधित आढळणार्या रुग्णांना गृहविलगीकरणात पाठविण्यात येते, अशा बाधितांची सध्याची संख्या खूपच कमी आहे. त्यांना रुग्णालयात किंवा विलगीकरणात दाखल करून घेण्याची गरज नसल्याने कोविड केंद्र बंद केले आहेत, मात्र येथील साहित्याची जबाबदारी आमच्याकडे नसल्याने त्याचे काय झाले हे आम्हाला माहिती नाही. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडे असावी.
– डॉ. सुधाकर मोरे,
जिल्हा आरोग्य अधिकारी
पूर्वी प्रसुती कक्ष, मेडिकल वॉर्ड, सर्जिकल वॉर्डमध्ये वापरात असणार्या खाटा कोविडसाठी वापरण्यात आल्या, आता त्या पुन्हा त्या-त्या वॉर्डमध्ये वापरल्या जात आहेत. तालुका स्तरावरील साहित्याची माहिती नाही, तर व्हेंटिलेटरसारखी उपकरणे तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने फारशी वापरात नाहीत.
– डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड