पनवेल ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील स्वतंत्र पोक्सो न्यायालय पनवेल येथे सुरू करण्याची मागणी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांनी ई-मेलद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. ते शक्य नसल्यास पनवेल न्यायालयीन क्षेत्रातील पोक्सो केसेस पनवेल जिल्हा न्यायालयात चालवण्यात याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील पोक्सोच्या केसेस चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना अलिबाग येथे केली आहे. त्यामुळे पनवेल येथील न्यायालयात सुरू असलेल्या पोक्सो केसेस अलिबागच्या न्यायालयात पाठविण्यात आल्या आहेत. या न्यायालयात असलेल्या केसेसपैकी 370 केसेस पनवेल येथील आहेत. माणगाव 85 आणि अलिबागमधील 55 केसेस आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल ही एकमेव महापालिका आहे. नवी मुंबई विमानतळ आणि परिसराचा होत असलेला औद्यगिक विकास यामुळे येथील लोकसंख्या झपाट्याने
वाढत आहे. अलिबाग येथे पोक्सोसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन केल्यास येथील वकील, तक्रारदार, साक्षीदार, पोलीस आणि न्यायालयीन कर्मचारी या सगळ्यांना अलिबागला जाणे त्रासाचे होणार आहे. पनवेल येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीत सगळ्या सुविधा उपलब्ध असल्याने पोक्सोसाठी विशेष न्यायालय पनवेल येथे सुरू करावे किंवा पनवेलमधील केसेस पनवेलच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात किंवा जिल्हा न्यायालयात चालवण्यात याव्यात, अशी मागणी लॉकडाऊन असल्याने ई-मेलद्वारे बारचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ आणि सेक्रेटरी प्रल्हाद खोपकर यांनी पनवेल बार असोसिएशनच्या वतीने उच्च न्यायालयाकडे केली आहे.