सानपाडा : प्रतिनिधी
ओरिएन्टल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, ओरिएन्टल कॉलेज ऑफ फार्मसी, ओरिएन्टल कॉलेज ऑफ लॉ, ओरिएन्टल कॉलेज ऑफ एज्युकेशन, ओरिएन्टल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 16) रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन भवन येथे पदवीदान समारंभ झाला. या वेळी 445 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप काशिनाथ शिंदे, भारत सरकारच्या प्रधानमंत्री आयुष युवाचे सल्लागार डॉ. विनयकुमार आवटे, सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी विभाग मुंबई विद्यापीठाचे प्राचार्य व अधिष्ठाता डॉ. सुरेश उकरांडे, नोव्होस्पेक्ट व्हेंचर्स प्रा.लि.चे सह-संस्थापक निखिल जुन्नरकर, गुरूनानक कॉलेज ऑफ एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे प्राचार्य डॉ. करुणा गुप्ता, बुरानी कॉलेज ऑफ भायखळाचे प्राचार्य डॉ. हैदर-ई-करार आदी उपस्थित होते. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती संदीप शिंदे म्हणाले की, आपण आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. आयुष्यामध्ये येणारी आव्हाने स्वीकारली पाहिजेत, संघटित होऊन काम केले पाहिजे. हाच आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे. या वेळी ओरिएन्टल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी शिक्षण मंत्री प्रा. जावेद खान यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओरिएन्टल एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य प्रा. रावसाहेब, सर्व प्राध्यापक वर्ग, तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.