Monday , June 5 2023
Breaking News

आग्र्यात काश्मिरींना हॉटेलबंदी

आग्रा ः वृत्तसंस्था

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी तरुणांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये काश्मिरी लोकांना हॉटेलमध्ये रूमही न देण्याचा निर्णय काही हॉटेलचालकांनी घेतला आहे. यासंदर्भातील काही पत्रकेही या हॉटेल व्यावसायिकांकडून छापण्यात आली आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एका हॉटेलचा व्यवस्थापक फिरदौस अलीने हॉटेलांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. भारतीय जवानांवर काश्मिरी लोक दगडफेक करतात, हल्ले करतात. या निषेधार्थ आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले आहे. आपल्या जवानांवर हल्ले करणार्‍या काश्मिरींचे आम्ही स्वागत कसे करावे? असा सवाल करताना जर त्यांनी आपल्या वागण्यात बदल केला तरच आम्ही त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देऊ, असेही त्याने म्हटले आहे. जगप्रसिद्ध ताजमहालच्या आग्रा शहरातील ईदगाहच्या परिसरात डझनभर हॉटेलचालकांनी असा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. मात्र आग्र्यातील हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राकेश चौहान यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. या भागातील केवळ दोनच हॉटेलांनी काश्मिरींसाठी हॉटेल न देण्याचा निर्णय घेतल्याचे आम्हाला कळाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी स्थानिक पोलिसांना आम्ही मध्यस्थी करण्यास सांगितल्याचेही त्याने म्हटले आहे. काश्मिरी आपले बांधव आहेत. त्यामुळे त्यांना बंदी करणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही. दहशतवाद काश्मीरवर परिणाम करीत असला तरी यासाठी तिथल्या रहिवाशांना आपण जबाबदार धरू शकत नाही. आपल्याला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करायला हवी, काश्मिरी जनतेविरोधात नाही, असेही चौहान यांनी म्हटले आहे.

Check Also

मन की बातमुळे जनआंदोलन उभे राहिले : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचा रविवारी …

Leave a Reply