पनवेल ः प्रतिनिधी
स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा अंतर्गत शुक्रवारी (दि. 30) पनवेलमधील प्रभाग 18मधील वडाळे तलाव बल्लाळेश्वर विसर्जन घाट येथे इंडियन कोस्टल गार्ड शालेय विद्यार्थी, महापालिका अधिकारी ,कर्मचारी आणि नागरिक यांच्या सहाय्याने शून्य कचरा मोहीम राबविण्यात आली. या शून्य कचरा मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या सफाई मोहिमेंतर्गत इंडियन कोस्टल गार्डचे स्वयंसेवक, नागरिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी यांनी वडाळे तलावाच्या विसर्जन घाटाची साफसफाई केली. ‘स्वच्छता ही सेवा’ या ब्रीदवाक्यासह करण्यात आलेल्या या सफाई मोहिमेमध्ये तलावातील सर्व प्लॅस्टिक व कचरा जमा करण्यात आला. उपायुक्त सचिन पवार आणि सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ भारतअभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022-23ची प्रभावी अमंलबजावणी सुरू आहे. पनवेल शहराच्या स्वच्छतेवरती महापालिकेने विशेष लक्ष दिले आहे. विशेषतः स्वच्छता हा नागरिकांच्या सवयीचा भाग व्हावा, लोकांमध्ये जनजागृती वाढावी, यासाठी पालिका विविध उपक्रम राबवित आहे. शून्य कचरा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे. पनवेल शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी पालिकेच्यावतीने विविध पातळ्यावरती प्रयत्न करते आहे. नागरिकांनी सण, समारंभ साजरे करताना प्लॅस्टिक वस्तू टाळून, पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा जेणे करून पर्यावरणाचे रक्षण होईल तसेच जास्तीचा कचरा निर्माण होणार नाही याबाबत यावेळी विद्यार्थी, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी स्वच्छतेविषयी जागरूक राहून शून्य कचरा उपक्रम राबवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. या वेळी प्रभाग अधिकारी अमर पाटील, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, स्वच्छता निरीक्षक जयेश कांबळे ,पर्यवेक्षक,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.