विविध सामाजिक संस्थांचा आवाहनाला उत्तम प्रतिसाद
पनवेल : बातमीदार
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या नागरिकांची उपासमार होत असल्यामुळे याची गंभीर दखल शासनाने घेतली असून जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या मुखात घास घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यामध्येही बुधवारी (दि. 8) सात हजारहून अधिक विना शिधापत्रिका धारकांना रेशन व्यवस्था करण्यात आली. या वेळी पनवेलमधील सामाजिक संस्थांनीही तहसीलदार अमित सानप यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना मदत करणे शक्य झाले असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
अमित सानप यांनी आवाहन केले होते की, ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी वस्तू रूपाने किंवा आर्थिक मदत करतील याचा सविस्तर अहवाल त्या त्या दानशूर व्यक्तीला प्रशासनामार्फत दिला जाईल. वस्तू रूपाने देणार्या दानशूर व्यक्तीने जेवढे सामान दिले असेल तेवढ्या सामानाचे वाटप कसे झाले याचा अहवाल तर आर्थिक रूपाने देण्यात येणार्या मदतीचा अहवाल त्या त्या दुकानदारांचे बिल आणि त्याचे किती पॅकेट तयार करून कोणत्या ठिकाणी देण्यात आले हे कळवून या महामारीमध्ये माणुसकी दर्शविण्याची एक संधी स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली होती.
या आवाहनाला पनवेलमधील उद्योजक आणि सेवाभावी संस्थांनी सढळ मदतीचा हात पुढे करून तालुक्यातील गरजूंना अन्नाचा घास दिला आहे. या वेळी ज्या ज्या सेवाभावी संस्थांनी शासनाकडे मदत केली आहे त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले तसेच अजूनही अन्य उद्योजकांनी तसेच सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन सानप यांनी केले आहे.