‘नफरत छोडो, भारत जोडो’ हा संदेश वस्तुत: राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांवर बिंबवण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या नावाबद्दलच आक्षेप घेतले गेले होते. जोडण्यासाठी भारत तुटला तरी कुठे आहे असा सवाल केला जात होता, जो रास्त आहे. जे मोडलेलेच नाही, ते जोडणार कसे? भारतीय समाज विविधतेने नटलेला समाज असला तरी त्याचा आत्मा एकच आहे. त्यामुळे गांधी यांच्या पदयात्रेचे पहिले पाऊलच चुकले होते असे म्हणावे लागते. ‘नफरत छोडो, भारत जोडो’ अशी घोषणा देत कन्याकुमारी येथून सुरू झालेली काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा सोमवारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे संपली. तब्बल साडेतीन-चार हजार किलोमीटरचे अंतर गांधी यांनी पायी पार केले. देशात पसरलेले कथित द्वेषाचे वातावरण नष्ट करून प्रेमाचा संदेश देणार्या या यात्रेत गांधी यांनी केलेली पायपीट सत्कारणी लागो अशीच सर्वांची इच्छा असेल. 1968 साली पंडित जवाहरलाल नेहरु यांनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला होता. त्यानंतर कैक दशके लोटल्यानंतर पंडितजींच्या पणतूने तेथेच ध्वजवंदन करावे हा योगायोग खचितच नव्हे. महात्मा गांधी यांच्या 75व्या पुण्यतिथीला राहुल गांधी यांनी श्रीनगर येथील सभेमध्ये प्रेमाचा संदेश दिला हे योग्यच झाले. आपण प्रेमाचे दुकान खोलत आहोत, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. जातिधर्माचे राजकारण करून फोडा व झोडा ही ब्रिटिशांचीच नीती स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या एतद्देशीय साहेब मंडळींनी स्वीकारली, तेव्हापासून ‘नफरत छोडो…’ हा नारा खरे तर काँग्रेसने द्यायला हवा होता. गांधी यांची पदयात्रा भारताच्या 12 राज्यांमधून गेली. दोन केंद्रशासित प्रदेशांमधून त्यांना वाट काढावी लागली. या संपूर्ण मार्गावर गांधी यांनी ऋणानुबंध प्रस्थापित केले असा काँग्रेसी जनांचा दावा आहे. श्रीनगरमधील समारोपाच्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी दिवंगत श्रीमती इंदिरा गांधी आणि आपले पिता राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेख आवर्जून केला. उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श करण्यासाठी आपल्या घरातील हौतात्म्य सांगणे त्यांना भागच पडले. यात्रेच्या समारोपाच्या वेळी देशभरातील 23 विरोधीपक्षांचे कडबोळे निमंत्रित करण्याचा घाट यात्रेच्या व्यवस्थापन समितीने घातला होता, परंतु याकडे शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव वा नीतीशकुमार हे फिरकले देखील नाहीत. आपल्या यात्रेचा आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाही. किंबहुना, ही पदयात्रा राजकीय स्वरुपाची नाहीच असे खासदार गांधी जवळपास प्रत्येक गावातील भाषणात सांगत होते. त्यांची यात्रा राजकीय हेतूने सुरू केलेली नव्हती हे घटकाभर मान्य केले, तरी पटण्याजोगे नाही. कारण विरोधीपक्षांचे अनेक नेते गांधी यांच्या सोबत फोटोपुरते का होईना वेळोवेळी सहभागी होतच होते. शिवाय, राजकीय स्वरूप नसलेल्या या यात्रेच्या समारोपाला भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलावण्याचे कारण काय होते? सारांश, काँग्रेसजन किंवा राहुल गांधी कितीही जोराने म्हणत असले तरी त्यांच्या पदयात्रेमागील हेतू शतप्रतिशत राजकीयच होता हे लपून राहिलेले नाही. गेल्या आठ वर्षांमध्ये काँग्रेसने जवळपास सर्व निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ला. आजही या पक्षाची वाताहत प्रचंड प्रमाणात झालेली दिसते. पक्षामध्ये नवसंजीवनी फुंकण्यासाठीच राहुल गांधी यांनी ही पायपीट केली हे उघड आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …