पनवेल : वार्ताहर
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भरधाव कारने धडक दिल्याने सदर ज्येष्ठ नागरिकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना खारघर, सेक्टर- 35 मध्ये घडली. खारघर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या महिला कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अपघातात मृत झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव नंदकुमार उग्रमोहन सिंग (वय 73) असे असून ते खारघर सेक्टर- 35 जी मधील अरिहंत अनाया सोसायटीत कुटुंबासह राहत होते. नंदकुमार सिंग बिहार पोलीस मधून रिटायर्ड झाले असून दोन महिन्यापूर्वीच ते पत्नीसह खारघरमध्ये मुलाकडे राहण्यास आले होते. दररोज प्रमाणे नंदकुमार सिंग सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. नंदकुमार सेक्टर- 35 ओवेगांव मधील मिष्ठान मिठाईच्या दुकानासमोरील ब्रीजवरुन चालत जात होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या टाटा पेच कारने त्यांना धडक दिली. या अपघातात नंदकुमार सिंग गंभीर जखमी झाल्याने त्यांना खारघर मधील आयुश हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कारचालक महिलेने निष्काळजीपणे भरधाव वेगात कार चालवून नेल्याने सदरचा अपघात झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खारघर पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
Check Also
25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …